महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० डिसेंबर । करोनाच्या उद्रेकानंतर वाढत्या अनिश्चिततेच्या वातावरणात विमा संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. साथीच्या काळात आरोग्यविषयक वाढलेल्या खर्चामुळे सामान्य लोकांमध्ये विम्याविषयी जागरूकता निर्माण झाल्याचे विमा कंपन्यांच्या व्यवसायातील वाढीची आकडेवारी दाखवून देते.आयुर्विमा कंपन्यांना पॉलिसीच्या पहिल्या हप्त्यापोटी मिळणाऱ्या उत्पन्नात सरलेल्या नोव्हेंबर महिन्यात ४२ टक्क्यांची वाढ होत ते २७,१७७.२६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे, असे विमा नियामक ‘इर्डा’ने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीवरून समोर आले.
विमा क्षेत्रात कार्यरत असलेल्या २४ आयुर्विमा कंपन्यांना गतवर्षी याच काळात १९,१५९.३० कोटी रुपयांचे उत्पन्न पहिल्या हप्त्यापोटी मिळाले होते. विमा नियामक ‘इर्डा’च्या आकडेवारीनुसार, भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) उत्पन्नामध्ये ३२ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवत ते नोव्हेंबरमध्ये १५,९६७.५१ कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे गेल्या वर्षी याच काळात १२,०९२.६६ कोटी नोंदविण्यात आले होते. तर उर्वरित खासगी क्षेत्रातील २३ कंपन्यांच्या उत्पन्नात ५८.६३ टक्क्यांची वाढ साधत उत्पन्न ११,२०९.७५ कोटी रुपये नोंदवले, जे वर्षभरापूर्वी याच महिन्यात ७,०६६.६४ कोटी रुपये होते.
चालू आर्थिक वर्षात एप्रिल-नोव्हेंबर या कालावधीत सर्व विमा कंपन्यांनी पॉलिसीच्या पहिल्या हप्त्यापोटी मिळणाऱ्या उत्पन्नात एकत्रित ८.४६ टक्क्यांची वाढ नोंदविली असून ते १,८०,७६५.४० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मात्र या पहिल्या आठ महिन्यांत ‘एलआयसी’च्या पहिल्या हप्त्यापोटी मिळणाऱ्या उत्पन्नात ०.९३ टक्क्यांनी घसरण झाली आहे. ते १,१४,५८०.८९ कोटी रुपयांवर आले आहे. या उलट खासगी क्षेत्रातील आयुर्विमा कंपन्यांचे एकत्रित आधारावर उत्पन्न एप्रिल-नोव्हेंबर या कालावधीत ३० टक्क्यांनी वाढून ते ६६,१८४.५२ कोटी रुपये झाले आहे.
आयुर्विमा क्षेत्रात ‘एलआयसी’ने ६३.३९ टक्के हिश्शासह सर्वाधिक बाजार हिस्सा राखला आहे. त्या पाठोपाठ एसबीआय लाइफ ८.७७ टक्के, एचडीएफसी लाइफचा ७.८६ टक्के, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ ४.९१ टक्के, मॅक्स लाइफ २.३६ टक्के आणि बजाज अलियान्झ लाइफचा २.६२ टक्के बाजार हिस्सा आहे.
आयुर्विमा व्यतिरिक्त सामान्य विमा कंपन्यांच्या विमा हप्त्याच्या उत्पन्नात सरलेल्या नोव्हेंबर महिन्यात ५.५ टक्क्यांनी वाढून ते १५,७४३.२२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जे गेल्या वर्षी (नोव्हेंबर २०२०) १४,९१९.४३ कोटी रुपये नोंदले गेले होते. सामान्य विमा क्षेत्रातील २४ विमा कंपन्यांच्या एकूण थेट विम्या हप्त्यामध्ये ४.२ टक्के वाढ होत ते १३,५६६.३९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. आरोग्य विमा क्षेत्रातील पाच कंपन्यांच्या विम्या हप्त्यामध्ये नोव्हेंबरमध्ये ३० टक्के वाढ झाली आहे. ते आता १,५१६.७७ कोटी रुपये झाले आहे.