महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० डिसेंबर । ‘प्रबोधन’ नियतकालिकाचा नुकताच शताब्दी वर्ष सोहळा पार पडला. यानिमित्ताने तीन खंड प्रकाशित करण्यात आले. मराठी भाषा विभागाच्या वतीने प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्यावर लघुपट तयार करण्यात येत आहे. पुढील एक-दोन महिन्यांत तो पूर्ण होईल. यानिमित्ताने महाराष्ट्राला प्रबोधनकारांचे विचार समजणार आहेत, असे मराठी भाषा मंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.
ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी लिहिलेल्या ‘आठवणीतील प्रबोधनकार’ या पुस्तकाच्या तिसऱया आवृत्तीचे प्रकाशन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मुंबई मराठी पत्रकार संघाच्या प्रशस्त सभागृहात करण्यात आले. यावेळी आमदार भास्कर जाधव, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, पुस्तकाचे लेखक विजय वैद्य, ‘मार्मिक’चे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, ‘न्यूज 18 लोकमत’चे संपादक महेश म्हात्रे, संघाचे विश्वस्त अजय वैद्य, प्रा. विसुभाऊ बापट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.