महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० डिसेंबर । शिर्डी येथे ‘श्रीं’च्या दर्शनासाठी येणाऱया साईभक्तांना बुधवारपासून प्रसादरूपी बुंदीच्या लाडू पाकिटांची विक्री करण्यास सुरुवात करण्यात आली. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने द्वारकामाई समोरील नाटय़गृह येथे लाडू विक्री काउंटर सुरू करण्यात आलेले आहे.
श्री साईबाबा संस्थानच्या वतीने 1990 सालापासून श्री क्षेत्र शिर्डी येथे येणाऱया साईभक्तांना तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर साजूक तुपातील, किसमिस, काजू, बदाम व वेलची आदी पदार्थांचा समावेश करून बुंदीच्या लाडूची प्रसाद स्वरूपात विक्री केली जाते. मात्र, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्या वतीने 5 एप्रिल 2021 पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले होते. त्यामुळे सशुल्क लाडू प्रसाद पाकीट विक्री पूर्णतः बंद करण्यात आली होती.
राज्य शासनाने 7 ऑक्टोबरपासून काही अटी व शर्तींवर धार्मिक स्थळे खुले करण्याचे आदेश दिलेले होते. परंतु, नगर जिह्यातील कोविड रुग्णांची संख्या लक्षात घेऊन संस्थानचे श्री साईप्रसादालय व भाविकांना लाडू वाटप बंद ठेवले होते. 26 नोव्हेंबरपासून श्री साईप्रसादालय भाविकांना प्रसाद भोजनाकरिता सुरू केले आहे. कोविड-19च्या संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून लाडू प्रसाद उत्पादन पुनश्च सुरू करण्यात येऊन बुधवारपासून (दि. 9)लाडू प्रसाद विक्री सुरू केली आहे.
टप्प्याटप्प्याने विक्री काउंटर सुरू होणार
z संस्थानच्या वतीने तीन लाडू असलेल्या पाकिटाकरिता ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर पंचवीस रुपयांप्रमाणे विक्री केली जात आहे. सदरचे लाडू विक्री काउंटर हे द्वारकामाई समोरील नाटय़गृह येथे सुरू केले आहे. साईभक्तांकडून या लाडू प्रसाद पाकिटास उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यानुसार संस्थानच्या वतीने टप्प्याटप्प्याने इतरत्रही लाडू विक्री काउंटर सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे कळविले आहे.