महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ डिसेंबर । CDS जनरल बिपिन रावत आणि मधुलिका रावत यांच्या मुली कृतिका आणि तारिणी यांनी आज दिल्ली कॅन्टोन्मेंटमधील बेरार स्क्वेअर स्मशानभूमीतून त्यांच्या पालकांच्या अस्थी गोळा केल्या. त्यासाठी आज सकाळी कृतिका आणि तारिणी अंत्यसंस्कारस्थळी पोहोचल्या होत्या. सीडीएस रावत आणि मधुलिका यांच्या अस्थी फुलदाणीत ठेवून लाल कापडाने बांधल्या होत्या.
मुलींनी ओल्या डोळ्यांनी आई-वडिलांच्या अस्थिकलशाला नमन केले.यावेळी दोघेही खूप भावूक दिसत होत्या. आज हरिद्वारमध्ये अस्थिकलशाचे विसर्जन करण्यात येणार आहे.
देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत त्यांच्या पत्नीसह गुरुवारी दिव्यत्वात लीन झाले. राज्य सन्मानासह, जनरल रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांना दोन्ही मुलींनी एकत्रितपणे दिल्ली कॅंटमध्ये 4:56 वाजता मुखाग्नी दिला.
देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांचे बुधवारी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. या हेलिकॉप्टरमध्ये पत्नी मधुलिका यांच्याशिवाय 13 लष्करी जवान आणि अधिकारी होते. या अपघातामध्ये ब्रिगेडियर एलएस लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, विंग कमांडर पीएस चौहान, स्क्वाड्रन लीडर के सिंग, नायक गुरसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, लान्स नायक विवेक कुमार, लान्स नायक बी. साई तेजा, ज्युनियर वॉरंट ऑफिसर दास, ज्युनियर वॉरंट ऑफिसर ए प्रदीप आणि हवालदार सतपाल शहीद झाले. हेलिकॉप्टर अपघातात ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे एकमेव बचावले आहेत.