महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ डिसेंबर । गेल्या आठवड्यामध्ये समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यभरात विविध ठिकाणी तुरळक तर कुठे मुसळधार पाऊस झाला आहे. याचाच परिणाम म्हणून बुलढाणा जिल्ह्यात वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला, हरभरा आणि तुरीच्या पिकांवर मोठ्या प्रमाणात विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात देखील आता कांद्याने पाणी आणल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्वच पिके घेणारे शेतकरी संकटात सापडले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यामध्ये कांद्याचे पीक देखील प्रामुख्याने घेतले जाते आणि खरीप हंगामा मध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे झालेल्या नुकसानाची घट भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कांदा पिकाची लागवड केली. मात्र कांद्याची जमिनीत वाढ झाली नसल्याने उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तर दुसरीकडे या कांद्याला आता मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्याचा यामधून लावलेला खर्चही निघत नाही आहे.
नांद्राकोळी येथील शेतकऱ्याने आपल्या एक एकरामध्ये चार किलो कांदा बियाण्याची पेरणी केली. मशागत केल्यानंतर हा कांदा काढला जातो, कांद्याची पेरणी केल्यापासून ते कांदा काढणीपर्यंत शेतकऱ्याला एकरी 60 हजार रुपयांच्या जवळपास खर्च आला आहे. यातून उत्पन्न हे केवळ 30 ते 35 हजार रुपये होणार असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये कांद्याला चांगला भाव असल्याने शेतकऱ्यांनी कांदा पिकाची लागवड केली. मात्र आता भाव झपाट्याने कमी झाल्याने या शेतकऱ्याच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणल्याचे दिसून येत आहे.