Anil Parab: एसटी संप चिघळणार ! परिवहन मंत्र्यांच्या ‘या’ आवाहनानंतर हि संप सुरूच

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ डिसेंबर । धुळे/ नंदुरबार: निलंबित करण्यात आले कर्मचारी सोमवारी कामावर हजर झाल्यास त्यांचे निलंबन मागे घेतले जाईल, असे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी सांगूनही काही उपयोग झालेला नाही. परबांच्या या आवाहनाला एसटी बस कर्मचाऱ्यांनी ठेंगा दाखवल्याचे चित्र धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात दिसून आलं आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये एकही निलंबित कर्मचारी सोमवारी सकाळी कामावर हजर झाला नाही.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या महिन्याभरापासून कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सरकारनं समिती स्थापन केली आहे. त्याशिवाय, पगारवाढीसह कर्मचाऱ्यांच्या अन्य काही मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत. त्यानंतरही कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला आहे. त्यामुळं राज्य सरकारनं निलंबनाचा बडगा उगारला होता. तरीही कामगार मागे हटत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळं परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना संधी दिली होती. निलंबित कर्मचारी कामावर आल्यास त्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळं किमान काही कर्मचारी तरी कामावर हजर होतील, अशी अपेक्षा परब आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना होती. मात्र, त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळालेला नाही. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुमारे ३०० संपकरी आंदोलन कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. यापैकी एकही कर्मचारी सकाळी ९ वाजेपर्यंत कामावर हजर झाला नव्हता. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच आगारांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला.

या दोन्ही जिल्ह्यांत सुमारे साडेसातशे बस या आगारात उभ्या आहेत. बस सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. दुप्पट, तिप्पट भाडे मोजून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आलेली आहे. त्यात खासगी वाहनांमध्ये प्रवासाच्या सुरक्षेची हमी नसल्यानं जीव धोक्यात घालून इच्छित स्थळी पोहोचण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. शासनानं या आंदोलनावर लवकर तोडगा काढावा, अशी मागणीही करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *