![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ डिसेंबर । तब्बल सहा लाख रुपयांचे 18 कॅरेट गोल्डपासून बनवलेले पाच तोळ्यांचे चमचमते बॉलपेन… जपानी झाडांपासून बनवलेले तसेच सोने-प्लॅटिनम पावडरमध्ये नक्षीकाम केलेले उरूशी पेन… दुबई शहराची प्रतिकृती साकारलेले शुद्ध चांदीपासून बनवलेले अडीच लाखांचे पेन… असे विविध प्रकारचे देशविदेशातील आकर्षक पेन पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली. निमित्त होते ते 11 आणि 12 डिसेंबरला पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या इंटरनॅशनल पेन फेस्टिव्हलचे.
सध्याच्या डिजिटल युगात कार्यालयीन कामासाठी पेनाचा वापर तसा कमीच झाला आहे. फाऊंटन पेनाच्या वापराला प्रोत्साहन मिळावे आणि फाऊंटन पेनाने लेखनाचा आनंद घेता यावा यासाठी व्हीनस ट्रेडर्सतर्फे या दोनदिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पार्कर, वॉटरमन, मॉन्टब्लँक, लॅमी, प्लॅटिनम, मॅग्ना कार्टा असे जगविख्यात ब्रॅण्डचे दोन हजारांहून अधिक पेन प्रदर्शनात मांडण्यात आले होते. अगदी 200 रुपयांपासून ते सहा लाख रुपये किमतीचे पेन या प्रदर्शनात होते. फाऊंटन, रोलर, मल्टिफंक्शनल, कॅलिग्राफी तसेच शाईची विविध प्रकारची 500 पेन या प्रदर्शनात ठेवण्यात आली होती.