महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ डिसेंबर । महाराष्ट्राच्या संघाचा कर्णधार व मागील आयपीएलपासून धावांचा पाऊस पाडणारा ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) व यंदाच्या आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरी करून नाणे खणखणीत वाजवणारा अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) या दोन खेळाडूंची आगामी दक्षिण आफ्रिकन दौऱ्यात (India Tour Of South Africa) भारतीय वन डे क्रिकेट संघात निवड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनुभवी डावखुरा सलामी फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्या निवडीवर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
रोहित शर्माकडे (Rohit Sharma) भारतीय वन डे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेतील वन डे मालिकेत रोहित शर्मासोबत लोकेश राहुल(KL Rahul) हा सलामीला फलंदाजीला येईल हे निश्चित आहे. त्यामुळे ऋतुराज गायकवाडची निवड झाली तरी त्याला सुरुवातीला बेंचवरच बसावे लागणार आहे. कारण त्याने आतापर्यंत सलामी फलंदाज म्हणूनच छान कामगिरी केली आहे. शिखर धवनने मागील आंतरराष्ट्रीय वन डे मालिकेत कर्णधार व फलंदाज म्हणून मोलाची कामगिरी बजावली असली, तरी सध्या सुरू असलेल्या विजय हजारे करंडकात त्याच्या बॅटमधून धावाच निघत नाहीत.
४३५ धावांचा रतीब
ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) विजय हजारे करंडकात चार सामन्यांमधून १४५ च्या सरासरीने ४३५ धावा फटकावल्या आहेत. यामध्ये तीन खणखणीत शतकांचा समावेश आहे. त्यामुळे पुण्याचा या प्रतिभावान खेळाडूचा सध्याचा फॉर्म बघता त्याची संघाच निवड होण्याची केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे.
३४८ धावा अन् ८ बळी
व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) मध्य प्रदेशच्या विजयात मोलाची भूमिका बजावतोय. व्यंकटेश अय्यरने चार सामन्यांमधून दोन शतकांसह ३४८ धावांची बरसात केली आहे. यामध्ये एक अर्धशतकाचाही समावेश आहे. तसेच तो प्रत्येक लढतींमध्ये ९ ते १० षटके गोलंदाजी करीत आहे. ज्यामध्ये त्याने आठ फलंदाजही बाद करून संघाच्या विजयात मोठा हातभार लावलेला आहे.