पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरात ‘ओमिक्रॉन’चा समूह संसर्ग नाही

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ डिसेंबर । दक्षिण आफ्रिकेतील ‘ओमायक्रॉन’च्या विषाणूने बाधित झालेले रुग्ण पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यात आढळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, पुण्यातील १४०० पैकी ९०९ करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नमुन्यांचे ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ करण्यात आले. पुण्यात अद्याप ओमायक्रॉन विषाणूचा स्थानिक भागात समूह संसर्ग झाला नसल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत; तर पुण्यात डेल्टा आणि त्याच्या प्रकारातील विषाणूचा संसर्ग असल्याचेही निदान झाले आहे.

ओमायक्रॉनचा विषाणू स्थानिक भागात पूर्वीपासून आहे का, याचा शोध घेण्यासाठी प्रकल्प घेण्यात आला होता. हा विषाणू पुण्यात पूर्वीपासून असता, तर त्यामुळे मोठा संसर्ग होण्याचा धोका होता. त्याचे निदान करण्यासाठी पुण्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये करोनाच्या चाचण्यांसाठी आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने घेण्यात आले. शहराच्या विविध प्रयोगशाळांमध्ये करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या; तसेच त्यांचा ‘सीटी व्हॅल्यू’ (छातीतील विषाणूंचे) हा २५पेक्षा कमी असलेल्या रुग्णांचे नमुने प्रामुख्याने ‘जीनोम सिक्वेन्सिंग’साठी निवडण्यात आले. २५पेक्षा कमी ‘सीटी व्हॅल्यू’ असलेल्या रुग्णांच्या शरीरात करोनाच्या विषाणूचे सर्वाधिक प्रमाण असण्याची शक्यता मानली जाते. या प्रकल्पासाठी बी. जे. मेडिकल कॉलेजच्या सरकारी रुग्णालयातील प्रयोगशाळा ही राज्यासाठी समन्वय प्रयोगशाळा म्हणून निश्चित करण्यात आली.

‘प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर), राष्ट्रीय कोषिका विज्ञान केंद्र (एनसीसीएस) या तीन प्रयोगशाळांमधून करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या चाचण्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंग करण्यासाठी पाठविण्यात आले. त्या तीन प्रयोगशाळांमधून १४०० पैकी ९०९ चाचण्यांचे नमुन्यांचे सिक्वेन्सिंग करण्यात आले. उर्वरित ४९१ नमुन्यांचे अहवाल अद्याप बाकी आहेत. ‘आयसर’ने सर्वाधिक ७६४ तर; ‘एनसीसीएस’ने १३९ आणि ‘एनआयव्ही’ने सहा नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग केले आहे,’ अशी माहिती बी. जे. मेडिकल कॉलेजच्या सूक्ष्मजीव शास्त्र विभागप्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली.

या सर्व प्रयोगशाळांमधून तपासण्यात आलेल्या चाचण्यांमधून एकाही चाचणीमध्ये ‘ओमायक्रॉन’चा विषाणू असल्याचे निदान झाले नाही. त्यामुळे पुण्यात हा विषाणू अद्याप नसल्याचे आढळले; तसेच त्या विषाणूचा समूह संसर्गही झाला नसल्याचे आढळून आले. ‘ओमायक्रॉन’चा विषाणू हा बाहेरून येण्याची शक्यता आहे. हा विषाणू पूर्वीपासून पुण्यात असता; तर स्थानिक भागातून मोठा संसर्ग झाला असता; पण सध्या तशी स्थिती नाही, असेही निरीक्षण डॉ. कार्यकर्ते यांनी नोंदविले.

पुण्यातील करोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांच्या चाचणीचे नमुने घेण्यात आले. त्या १४०० पैकी ९०९ जणांचे जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले. त्यात पुण्यात अद्याप कोठेही ओमायक्रॉन विषाणूचा समूह संसर्ग झालेला नसल्याचे स्पष्ट झाले. उलट या चाचण्यांमध्ये पुण्यात डेल्टा आणि त्याच्या काही प्रकारांच्या विषाणूंचा संसर्ग होत असल्याचे निदान झाले आहे.

– डॉ. राजेश कार्यकर्ते, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख, बी. जे. मेडिकल कॉलेज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *