महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१६ डिसेंबर । ऑस्ट्रेलियाच्या आजवरच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या मायकल स्लेटर याला अटक करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी 7.45 वाजता पोलिसांनी त्याला अटक केली आणि तिथून त्याला मॅनली पोलीस ठाण्यात नेण्यात आले. स्लेटरला न्यायालयासमोर उभे केला असता न्यायालयाने त्याला जामीन देण्यास नकार दिला.
स्लेटरवर त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी मेलानी लिवसे हिला त्रास दिल्याचा आरोप आहे. मेलानीने आरोप केला आहे की स्लेटरने तिला एकापाठोपाठ एक शेकडो मेसेज पाठवले, लागोपाठ कॉल केले आणि सातत्याने ईमेलही पाठवले. स्लेटरने यापूर्वीही मेलानीला त्रास दिला होता, ज्यामुळे तिने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत मेलानीला संरक्षण दिले होते. या संरक्षणाचा भंग केल्याने स्लेटरला अटक करण्यात आली आहे.
स्लेटरने मेलानीला 12 ऑक्टोबर आणि 13 ऑक्टोबरला हा त्रास दिला होता. स्लेटरचे वकील जेम्स मॅलॉगलीन यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना म्हटलं की स्लेटर हा याच संदर्भातील उपचारांसाठी रुग्णालयात होता. 23 डिसेंबरला मॅलॉगलीन यांनी न्यायालयात म्हटलं की स्लेटरविरूद्धचे प्रकरण हे मानसिक आरोग्य कायद्याअंतर्गत चालवण्यात यावे. स्लेटर याला मानसिक आजार होता आणि त्यातून त्याने हे कृत्य करण्याचा प्रयत्न केला असं दाखवण्याचा मॅलॉगलीन यांचा प्रयत्न होता, मात्र त्यांच्या या नव्या पवित्र्यावर न्यायाधीशांनी ‘गंमत करताय का’ असा प्रश्न विचारत त्यांच्या प्रयत्नांमधील हवाच काढून घेतली. यापूर्वी इतर आरोपींनाही मानसिक आजारी असल्याचं दाखवून त्यांच्याविरूद्धचे खटले रद्द करण्याचे किंवा सौम्य करण्याचे प्रयत्न फोल ठरले असल्याचं सांगत न्यायाधीशांनी मॅलॉगलीन यांना त्यांचे युक्तिवाद लेखी स्वरुपात न्यायालयात मांडायला सांगितले.