महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ डिसेंबर । कोरोना व्हेरिएंट ओमायक्रोनचा धोका असताना मुंबईत आतापासूनच वर्षअखेरच्या पाटर्य़ांची रेलचेल सुरू झाल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे गर्दीमुळे होणाऱ्या रुग्णवाढीचा धोका टाळण्यासाठी पालिकेने प्रत्येक वॉर्डात 2 ते 5 भरारी पथके नेमून कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये नियुक्ती करण्यात येणाऱ्या 100 पथकांच्या माध्यमातून कोरोना खबरदारीचे नियम मोडल्याचे निदर्शनास आल्यास पोलिसांच्या सहाय्याने कठोर कारवाई केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
मुंबईत कोरोना नियंत्रणात आला असला तरी अजूनही दररोज सुमारे 150 ते 250 पर्यंत कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. असे असताना दक्षिण आफ्रिकेसह युरोपीय देशांमध्ये आलेल्या कोरोना व्हेरिएंट ओमायक्रोनचाही धोका असल्याने काळजी घेण्याची गरज आहे. असे असताना अनेक ठिकाणी आयोजित कार्यक्रम, पाटर्य़ांमध्ये कोरोना खबरदारीचे नियम मोडले जात असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, नियम मोडणाऱ्यांमध्ये अनेक सेलिब्रिटींचाही समावेश असल्याचे समोर आल्याने पालिकेने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.