शाळांत वेद-गीता शिकवा; मराठा, शीख, गुर्जर, आदिवासींच्या इतिहासाचाही समावेश करा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ डिसेंबर । देशभरातील शाळांच्या अभ्यासक्रमात सुधारणा करण्यासाठी स्थापन केलेल्या संसदेच्या स्थायी समितीने चारही वेद आणि भगवद्गीतेतील महत्त्वाच्या गोष्टी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची शिफारस केली आहे. समितीला देशभरातून २० हजार सूचना मिळाल्या होत्या. त्यांचा अहवालात समावेश करून त्या सभागृहात सादर करण्यात आल्या. मराठा, शीख, गुर्जर, जाट आणि आदिवासी यांचा इतिहास तसेच भारतीय महाकाव्यांना शालेय पुस्तकात स्थान द्यावे, असे अहवालात म्हटले आहे. भाजप खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखालील ३१ सदस्यीय समितीने अहवालात म्हटले की, वेद आणि गीतेतील तपशील शालेय पाठ्यपुस्तकांत समाविष्ट करावा. विक्रमादित्य, चोल, चालुक्य, विजयनगर, गोंडवानाचे शासक, बौद्ध, त्रावणकोर आणि ईशान्येचे अहोम यांचा इतिहासही समाविष्ट करावा. अनेक देशांत धार्मिक अभ्यासासाठी समर्पित विद्यापीठ आहेत, भारतातही अशी विद्यापीठे असावीत.

दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी महाराष्ट्राचे मॉडेल स्वीकारावे
समितीने म्हटले की, महाराष्ट्रात पहिलीच्या मुलांसाठी फक्त एक पुस्तक आहे, त्यात विविध विषयांचा समावेश आहे. इतर राज्यांनीही सुरुवातीच्या स्तरावर हेच मॉडेल स्वीकारावे.

पर्यावरण संवेदनशीलता, मानवीय मूल्ये व विशेष मुलांसाठी आवश्यक विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यावर भर देण्यात यावा. तसेच इंटरनेटच्या सवयीचे दुष्परिणाम या विषयाचाही अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा.

पाठ्यपुस्तकांमध्ये स्थानिक इतिहासाचाही समावेश करावा
पाठ्यपुस्तकातील आशयाला पूरक म्हणून भ्रमण (फिरणे/दौरा) अनिवार्य रूपात समाविष्ट करावे. पुस्तकांत एखाद्या स्थळाचे नाव आले तर त्याच्यासोबत त्याचे धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व ही माहिती देण्यात यावी. एनसीईआरटी आणि एससीईआरटीने पुस्तकांत स्थानिक इतिहासाचाही समावेश करावा. शक्य असेल तर हे सर्व स्थानिक भाषेत शिकवले जावे.

नालंदा, तक्षशिलासारखे मॉडेल विकसित करण्याची शिफारस
स्थायी समितीने एनसीईआरटीला केलेल्या सूचनेनुसार, परिषदेने जिल्हानिहाय इतिहास व स्थानिक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांबाबत जिल्हा स्तरावर पाठ्यपुस्तके तयार करावीत. त्यात पारंपरिक भारतीय ज्ञानप्रणालींचे शास्त्र, गणित, तत्त्वज्ञान, आयुर्वेद आणि कला यांचा समावेश असावा. नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठाच्या शैक्षणिक पद्धतींचा अभ्यास करून नवीन मॉडेल विकसित करण्यात यावे.

अहिल्यादेवी, सावित्रीबाईंसारखी व्यक्तिमत्त्वे पुस्तकात असावीत
समितीने म्हटले की, पाठ्यपुस्तकांत महिलांच्या योगदानाला प्रतिनिधित्व मिळावे. त्यात अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, अबला घोष, आनंदी गोपाळ जोशी, अनसूया साराभाई, आरती साहा, अरुणा असफ अली, कनकलता डेका, राणी मां गुडुंगलू, आसीमा चटर्जी, कॅप्टन प्रेम माथुर, चंद्रप्रभा सैकिनी, कोरनेलिया सोराबजी, दुर्गावतीदेवी, जानकी अम्माल, कल्पना चावला यांच्या नावाचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *