महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ डिसेंबर । भारताविरुद्ध 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिके(South Africa)च्या संघाला मोठा धक्का बसलाय. वेगवान गोलंदाज अनरिक नॉर्किया (Anrich Nortje) भारताविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडलाय. टेस्ट टीममध्ये निवड होण्यापूर्वीच अनरिक नॉर्किया दुखापतीनं ग्रस्त होता, पण टेस्ट मॅचच्या आधी नॉर्किया दुखापतीतून सावरू शकला नाही, त्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेच्या टीममधून बाहेर पडावं लागलंय.
त्याच्याजागी इतर कोणताही खेळाडू नाही
अनरिक नॉर्किया हा दक्षिण आफ्रिकेच्या या संघाच्या गोलंदाजीतला महत्त्वाचा घटक आहे. कागिसो रबाडासोबत त्यानं दक्षिण आफ्रिकेला महत्त्वाच्या प्रसंगी यश मिळवून दिलंय. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय, की अनरिक नॉर्किया त्याच्या आधीच्या दुखापतीमुळे टीम इंडियाविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडलाय. कोविड-19मुळे नॉर्कियाच्या जागी इतर कोणत्याही खेळाडूच्या नावाची घोषणा केली जाणार नाही.
कोविड-19चा (Covid)नवा व्हेरिएन्ट ‘ओमिक्रॉन'(Omicron)चे दक्षिण आफ्रिकेत जास्त रुग्ण आहेत, त्यामुळे दोन्ही संघ एक मजबूत बायो-बबलमध्ये जगत आहेत. अनरिक नॉर्कियानं यावर्षी 5 कसोटी सामन्यात 25 विकेट घेतल्या आहेत. 28 वर्षीय नॉर्किया त्याच्या फिटनेसवरून बऱ्याच दिवसांपासून हैराण आहे. नॉर्कियानं आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेसाठी 12 कसोटी सामने खेळले असून त्यात त्यानं 47 विकेट घेतल्या आहेत. नोर्कियानं 2019मध्ये पुण्यात भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केलं. अनरिक नॉर्कियाला त्याच्या फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सनं पुढील हंगामासाठी देखील कायम ठेवलं होतं.