महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२८ डिसेंबर । विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन यावेळी एका वेगळ्याच कारणाने गाजले आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीलाही विरोधकांकडून पायऱ्यांवर आंदोलन केले जात होती. ते सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते. यावेळी आमदार नितेश राणे यांनी आमदार आदित्य ठाकरे येताच म्याव-म्याव असा अवाज काढला होता. आता प्रकरणावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. तसेच आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावरुन आमदारांचे कान टोचले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, यंदाचे अधिवेशन हे जनतेच्या प्रश्नांच्या तुलनेमध्ये कुत्र्या-मांजरांच्या आवाजानेच जास्त गाजले आहे. हा सर्व प्रकार अत्यंत लज्जास्पद आहे. ज्या लाखो मतदारांनी विश्वास टाकल्यानंतर आमदार सभागृहापर्यंत पोहोचतात, त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, आपण इथे कुत्री, मांजर आणि कोंबड्यांचं प्रतिनिधीत्व करत नाहीत. असे वागलो तर लाखो मतदारांच्या विश्वासाला तडा जाईल. सदस्यांनी आपण काय बोलतोय, याचे भान ठेवा’ असे म्हणत उपमुख्यमंत्र्यांना आमदारांचे कान टोचले आहे.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘असे वागणे म्हणजे लाखो मतदारांचा अपमान केल्यासारखे आहे. मतदारांना काय वाटेल, आपला माणूस तिथे जातो आणि अशा पद्धतीनं आवाज काढतो, टवाळी करतो? त्यामुळे सगळ्यांनीच चारही प्रमुख प्रक्ष, इतर अपक्ष सदस्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घ्यायला हवे’ असे देखील अजित पवार म्हणाले.
नितेश राणेंच्या कृत्यानंतर राजकारण चांगलेच तापले.यानंतर विधानसभे याविषयावर चर्चा घेण्यात आली. असे वागणे बरोबर नसल्याचे भाजपच्या नेत्यांकडून देखील म्हणण्यात आले. विधिमंडळ आणि आवारामध्ये सदस्यांच्या वर्तणुकीबाबत आचारसंहिता असावी अशी भूमिका विरोधकांसह सत्ताधाऱ्यांकडून देखील घेण्यात आली. यानंतर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा उपाध्यक्षांच्या बोलत दालनात सभासदांचे वर्तन याबाबत बैठक घेतली गेली. त्यानंतर सभासद वर्तनाबाबत एक नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. याविषयावरुनच उपमुख्यमंत्र्यांनी आज आपली भूमिका मांडली आहे.