नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या पुन्हा सुनावणी : संतोष परब हल्ला प्रकरण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२८ डिसेंबर । संतोष परब हल्लाप्रकरणावरून शिवसेनेने भाजपा आमदार नितेश राणे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. शिवाय, नितेश राणेंना अटक व्हावी अशी देखील मागणी करण्यात आली असून, तशी पोलीसात तक्रार देखील दाखल केली गेली आहे. तर, नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनाबाबत आज देखील न्यायालयात निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे आता उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.

आज जवळपास पाच ते सहा तास सुनावणी झाली आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने उद्यावर सुनावणी ढकलली आहे. न्यायालयाच्या कामकाजाची वेळ संपल्यामुळे ही सुनावणी उद्या होणार आहे. त्यामुळे नितेश राणेंना जामीन मिळणार की नाही? याचा निर्णय उद्याच होणार आहे.

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे तर आमदार नितेश राणे व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश सावंत यांना पोलिसांनी चौकशीसाठी पाचारण केल्यानंतर अटकेच्या भीतीने जिल्हा व सत्र न्यायालयात दोघांनीही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याच्यावर आज युक्तिवाद झाला. उद्या पुन्हा एकदा युक्तिवाद होईल असे सरकारी अँड प्रदीप घरत यांनी म्हटले आहे.

आमदार नितेश राणे यांच्यासाठी अँड. संग्राम देसाई तर संदेश सावंत यांच्यासाठी अँड. राजेंद्र रावराणे आणि सरकार पक्षातर्फे अँड प्रदीप भरत व अँड भूषण साळवी यांनी न्यायालय मध्ये उपस्थित राहून युक्तिवाद केला. आज अटकपूर्व जामीन अर्जावर निर्णय होत नसल्याने अँड देसाई यांनी आमदार नितेश राणे यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून न्यायालयात विनंती केली पण न्यायालयाने नकार दिला. मात्र उद्या युक्तिवादानंतर सुनावणी होणार आहे.

आजच्या सुनावणीनंतर सरकारी वकीलांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, “त्यांनी त्यांचा युक्तीवाद केला तो आम्ही काळजीपूर्व ऐकला. त्यांना काय म्हणायचं आहे ते समजून घेऊन, त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याला उत्तर देणं हे आमचं कर्तव्य आहे. त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या प्रत्येक मुद्य्याला उत्तर देण्यास सुरूवात केलेली आहे. परंतु आमचा युक्तीवाद आज पूर्ण झालेला नाही. उद्या आमचा युक्तीवाद सुरू राहील तो पूर्ण झाल्यानंतरच आम्हाला यावर अधिक बोलता येईल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *