बाळासाहेबांचा नातु हर्षवर्धन पाटलांचा जावई, अंकिता-निहार विवाह बंधनात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२८ डिसेंबर । स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार बिंदूमाधव ठाकरे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या जिल्हा परिषद सदस्य अंकिता हर्षवर्धन पाटील यांचा मोठ्या शाही थाटात आज मुंबईमध्ये ‘ताज’ हॉटेलमध्ये विवाह संपन्न झाला. या निमित्ताने ठाकरे आणि पाटील घराण्याचे नवीन ऋणानुबंध तयार झाले आहेत . गेल्या अनेक दिवसांपासून या विवाहाची चर्चा होती, काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांना लग्नासाठी निमंत्रण देण्यासाठी हर्षवर्धन पाटील आणि अंकिता पाटील दोघेही गेले होते, त्या फोटोचीही बरीच चर्चा होती. आज अखेर हा विवाहसोहळा संपन्न झाला आहे.

अंकिता पाटील या विद्यमान पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले असले तरी अंकिता पाटील अद्याप काँग्रेसमध्येच आहेत. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये आणि एक वर्ष लंडन येथील हायवार्ड मध्ये शिक्षण घेतले आहे. तसेच त्या इंडियन शुगर मिल असोसिएशनच्या सदस्या आहेत.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असलेले निहार ठाकरे यांचं एलएलएमपर्यंत शिक्षण झालं आहे. त्यांनी वकिली व्यवसायात आपला जम बसवला आहे. निहार यांचे वडील बिंदुमाधव यांचं 1996 मध्ये अपघाती निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर बाळासाहेबांना मोठा धक्का बसला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे हे निहार यांचे सख्खे काका आहेत. तर राज ठाकरे हे चुलत काका आहे. अंकिता पाटील आणि निहार ठाकरे आज मुंबई येथे ‘ताज’ हॉटेलमध्ये विवाहबद्ध झाले असून राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी वधूवरांना शुभ-आशीर्वाद दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *