महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३१ डिसेंबर । राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील करोनावर वेळीच नियंत्रण मिळवलं नाही तर जानेवारी आणि एप्रिलमध्ये विस्फोटक परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा दिला आहे. तसेच लोकांनी सर्व नियम पायदळी तुडवले तर लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही, असंही नमूद केलं. ते टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
विजय वडेट्टीवार म्हणाले, “वेळीच नियंत्रण मिळवलं नाही, तर महाराष्ट्रात जानेवारी आणि एप्रिलमध्ये करोनाची विस्फोटक परिस्थिती निर्माण होईल. करोना वेगाने पसरतो आहे. त्यामुळे हे नियंत्रण लोकांच्या हातात आहे. आपण कसं राहायचं, काय नियम पाळावे, काय नियम पाळू नये हे लोकांनी ठरवायचं आहे. लोकांनी जर सर्व नियम पायदळी तुडवले तर लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही.”
“मागील वेळी रेल्वे, विद्यार्थी किंवा इतर जे काही निर्बंध लावले होते त्या सर्व गोष्टींचा विचार करता आता लॉकडाऊनची स्थिती येते आहे. हा लॉकडाऊन कधी करायचा हा निर्णय मुख्यमंत्री घेतील,” असंही विजय वडेट्टीवार यांनी नमूद केलं.
चित्रपटगृहे, मॉल्सवरही निर्बंध येणार? शाळाही होणार बंद?
दरम्यान, राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शुक्रवारी (३१ डिसेंबर) मध्यरात्रीपासूनच निर्बंध लागू केले आहेत. यामुळे कार्यक्रमांसाठी एकत्र जमणाऱ्या लोकांची मर्यादा ५० करण्यात आली आहे. अंत्यविधीसाठी देखील २० लोकांचं बंधन घालण्यात आलं आहे. सध्या काही मोजक्याच गोष्टींवर निर्बंध घातले असले तरी या निर्बंधांमध्ये वाढ करण्याचा विचार राज्य सरकार गांभीर्याने करत आहे. यासंदर्भात गुरुवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सविस्तर चर्चा झाली. यामध्ये शाळा, कॉलेज, मॉल्स, चित्रपटगृह यांच्यावरील संभाव्य निर्बंधांवर देखील खल झाला. तसेच, गंभीर परिस्थिती उद्भवल्यास लॉकडाऊनच्या पर्यायावर देखील चर्चा झाली.