महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ जानेवारी । जिल्ह्यात रविवारी (दि.०२) दिवसभरात एकूण ११७ रुग्ण नव्याने बाधित आढळले असून, ६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या शंभरीपार पोहोचल्याने उपचारार्थी रुग्णसंख्येत मोठी भर पडत असल्याने तीन दिवसांपूर्वी चारशेपर्यंत पोहोचलेली संख्या रविवारी ६९१ पर्यंत पोहोचली आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सलग वाढ होत असताना दिलासा देणारी बाब म्हणजे दिवसभरात एकाही कोरोना बळीची नोंद झालेली नाही. जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असताना प्रलंबित अहवालांच्या संख्येत मात्र लक्षणीय घट झाली असून, ही संख्या १८९ पर्यंत कमी झाली आहे. त्यात नाशिक मनपा १४६, नाशिक ग्रामीण ३२, तर मालेगाव मनपाचे ११ अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान कोरोनामुक्ततेच्या प्रमाणात पुन्हा अल्पशी घट येऊन ते ९७.७२ टक्के झाले आहे. दरम्यान, कोरोनाबाधित संख्येत मोठी वाढ झाल्याने कोराेना उपचारार्थी संख्यादेखील सातशेनजीक अर्थात ६९१ पर्यंत पोहोचली आहे.
जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी बळींची संख्या शून्य असल्याचा यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच गत आडवडाभरात तीनवेळा कोरोना बळी शून्य राहिले आहेत. रुग्णसंख्या वाढत असताना काहीसा दिलासा बळींमध्ये मिळाला असला तरी तो वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कितपत कायम राहील याबाबत साशंकताच आहे.