![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .४ जानेवारी । देशातील बेरोजगारीच्या भीषण समस्येवर उपाय शोधण्यात केंद्रातील मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. मागील चार महिन्यांत रोजगाराला पुन्हा भयानक गळती लागली असून डिसेंबरमध्ये देशाचा बेरोजगारी दर थेट 7.91 टक्क्यांवर पोहोचला आहे. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ (सीएमआयई) या खासगी संस्थेच्या अहवालातून बेरोजगारीचे हे भीषण वास्तव समोर आले आहे.
कोरोना महामारीने हिसकावलेला रोजगार पूर्वपदावर आणण्यास केंद्रातील मोदी सरकारला अपयश आल्याचे या आकडेवारीवरून उघडकीस आले आहे. सीएमआयईच्या अहवालानुसार सप्टेंबरमध्ये 6.86 टक्क्यांवर राहिलेला बेरोजगारी दर पुढच्या तीन महिन्यांतच थेट 7.91 टक्क्यांवर झेपावला आहे. ऑगस्ट 2021नंतरचे बेरोजगारीचे हे सर्वाधिक प्रमाण आहे. ऑगस्ट महिन्यात 8.32 टक्के इतका बेरोजगारी दर होता. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये 7.15 टक्के, नोव्हेंबरमध्ये 7 टक्के आणि डिसेंबरमध्ये 7.91 टक्के अशा प्रकारे बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. देशात पुरेशा प्रमाणात रोजगार उपलब्ध करण्यात मोदी सरकार अपुरे पडल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.