महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .५ जानेवारी । पालघरच्या शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) काल आपलं काम चोख बजावलं. सात विकेट घेऊन त्याने दक्षिण आफ्रिकेचं कंबरड मोडून काढलं. त्याच्या परफॉरमन्समुळेच दक्षिण आफ्रिकेला मोठी आघाडी घेता आली नाही. संघाला गरज असताना शार्दुलने खेळपट्टीवर जमलेल्या जोड्या फोडल्या व विकेट मिळवून दिले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 229 धावात आटोपला. भारताचा भेदक गोलंदाज मोहम्मद सिराज दुखापतीमुळे फार षटके गोलंदाजी टाकू शकत नव्हता. त्यावेळी बुमराह, शामीच्या साथीने शार्दुलने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली व चोख काम केलं. (India vs South Africa johannesburg Test Ajinkya Rahane & cheteshwar pujara now final chance to perform)
आता हा कसोटी सामना कुठल्या दिशेने जाणार ते सर्वस्वी फलंदाजांवर अवलंबून आहे. काल गोलंदाजांची परीक्षा होती. आज फलंदाजांची परीक्षा आहे. पहिला कसोटी सामना असो किंवा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव गोलंदाजांमुळेच जोहान्सबर्ग कसोटीत भारताचं आव्हान टिकून आहे. पहिल्या डावातील अपयशामुळे अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराचे टेस्ट करीअर संपणार अशा चर्चा आहेत. कारण दोघांना बऱ्यात संधी देऊनही त्यांनी अपेक्षित कामगिरी केलेली नाही.
आज टीकाकारांची तोंड बंद करण्याची कदाचित शेवटची संधी त्यांच्याकडे असू शकते. आज दोघांनी लौकीकाला साजेशी कामगिरी करुन भारताला सुस्थितीत पोहोचवलं, तर पुन्हा हिरो होण्याची संधी आहे. दोघांवर प्रचंड दबाव आहे, यात अजिबात शंका नाही. पण अशाच परिस्थितीत त्यांनी स्वत:च नाण खणखणीत वाजवून दाखवलं, तर टीका करणारेच आज त्यांना डोक्यावर घेतील. काल सुरुवात तर चांगली झाली आहे. फक्त आता त्यांना सातत्य दाखवावं लागेल. त्या दोघांवरच नव्हे, तर ऋषभ पंत, हनुमा विहारी, अश्विन, शार्दुल यांनाही आपली भूमिका चोख बजावावी लागेल. भारताला दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच ऐतिहासिक कसोटी मालिका विजयाची संधी आहे.