थरारक… धावा सोडा सर्वच चेंडू मोजायला लागले ; इंग्लंड व्हाईट वॉश पासून वाचला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .९ जानेवारी । ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी फक्त एका विकेटचीच गरज होती आणि शिल्लक होते ते १२ चेंडूं. त्यानंतर कोणीही धावा मोजत नव्हते, सर्वच चेंडू मोजायला लागले आणि या सामन्याचा शेवटच्या चेंडूपर्यंत थरारक अनुभव यावेळी चाहत्यांनी घेतला.

जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी यावेळी चांगलीच झुंज दिली. अखेरचा चेंडू यावेळी जेम्स अँडरसनने सावधपणे खेळून काढला आणि इंग्लंडच्या खेळाडूंसह चाहत्यांनी यावेळी सुटकेचा निश्वास सोडला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिडनी कसोटी अनिर्णित राहिली. कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर ३८८ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. ही कसोटी जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला शेवटच्या दिवशी इंग्लंडच्या संपूर्ण संघाला बाद करावे लागणार होते, पण त्यांना इंग्लंडचे ९ गडीच बाद करता आले. परिणामी, सिडनी कसोटी अनिर्णित राहिली. या सामन्यामुळे अॅशेस मालिकेत इंग्लंडला क्लीन स्वीप करण्याची ऑस्ट्रेलियाची इच्छाही मावळली आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील ४ कसोटी सामने खेळल्यानंतर ऑस्ट्रेलिया ३-० ने विजयी आघाडीवर आहे.

ब्रिस्बेन, अॅडलेड आणि मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील सुरुवातीचे तीनही कसोटी सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. सिडनीमध्येही इंग्लंडला झोडपण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण तो फसला. इंग्लंडच्या तळातील फलंदाजांनी निकराने लढा दिल्याने ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा मावळल्या. चौथ्या अॅशेस कसोटीत पावसाने अनेकदा व्यत्यय आणला. शेवटच्या दिवशी एकूण ९८ षटके इंग्लंडला खेळून काढायची होती. तसेच ३८८ धावांचे लक्ष्यही गाठायचे होते.

पॅट कमिन्सने घेतले एकाच षटकात दोन बळी
कर्णधार पॅट कमिन्सने सामना जिंकण्यासाठी जीव ओतला होता. त्याने ८५ व्या षटकात दोन महत्वाचे बळी घेतले. कमिन्सने पहिल्यांदा जोस बटलरला ११ धावांवर बाद केले, त्यानंतर एका चेंडूनंतर मार्क वुडला खाते उघडण्यापूर्वी पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. हे दोन्ही फलंदाज पायचित झाले होते.

ऑस्ट्रेलियाला इंग्लंडची शेवटची विकेट काढता आली नाही
कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला इंग्लंडला विजयासाठी १० विकेट्स घ्यायच्या होत्या, पण सिडनीचे हवामान त्यांच्या मार्गात अडथळा ठरले. पाचव्या दिवशी पावसाने खेळ थांबवण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या ३ विकेट्स घेतल्या होत्या. पाऊस थांबल्यावर खेळ सुरू झाला, तेव्हा आणखी ६ गडी बाद झाले, पण विजयासाठी आवश्यक असलेला शेवटचा बळी ते घेऊ शकले नाही. सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावणाऱ्या उस्मान ख्वाजाला अनिर्णित सिडनी कसोटीचा सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *