महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. २० जानेवारी | मुख्यमंत्री म्हणतात, महाराष्ट्र पाच वर्षांत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होणार! हे ऐकल्यावर मला प्रश्न पडतो—हे भाषण आहे की भविष्यकथनाचा शो? जग मंदावले आहे, युद्धाचे ढग दाटले आहेत, जागतिक अर्थव्यवस्था सर्दीत कुडकुडते आहे, पण महाराष्ट्र मात्र स्पोर्ट्स बाईकवर बसून ‘फुल थ्रॉटल’ देतोय! हे कौतुकास्पद आहे की धोकादायक, हा प्रश्न विचारण्याची हिंमत आजकाल कमीच लोक करतात. कारण स्वप्न दाखवणारा नेता आवडतो, स्वप्नावर प्रश्न विचारणारा टीकाकार ‘निगेटिव्ह’ ठरतो.
मुख्यमंत्री सांगतात—गुंतवणूक भरपूर आहे, फक्त परिसंस्था हवी. छान! पण ही परिसंस्था मुंबई-पुण्याच्या बाहेर कितपत पोहोचली आहे, यावर मौन आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकणातील युवक अजूनही नोकरीसाठी मुंबई लोकलमध्ये लटकतोय. दावोसचे १६ लाख कोटींचे करार ऐकायला भारी वाटतात, पण शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेली रक्कम किती, हा आकडा भाषणात दिसत नाही. ‘एमएसएमई कणा आहे’ असे म्हणताना त्या कण्याला अजूनही बँक, वीज, जमीन आणि परवानग्यांच्या वेदना का सहन कराव्या लागतात, हा प्रश्न आत्र्यांच्या शैलीत विचारावासा वाटतो—“कणा मजबूत आहे, पण पाठीवर ओझेच ओझे का?”
डेटा सेंटर, एज्यु सिटी, इनोव्हेशन सिटी, स्पोर्ट्स सिटी—मुख्यमंत्री शहरांची नावे इतक्या वेगाने घेतात की वाटते महाराष्ट्र नकाशा नसून रिअल इस्टेट ब्रोशर आहे. कल्पना उत्तम आहेत, नक्कीच. पण गावात अजूनही इंटरनेट सिग्नल झाडावर चढून शोधावा लागतो, शाळेत शिक्षक अपुरे आहेत आणि आरोग्य केंद्रात डॉक्टर आठवड्यातून दोन दिवस येतो—हे वास्तव ‘सिटी’च्या चमकदार स्लाइडमध्ये बसत नाही. एआयची स्वप्ने दाखवताना ‘माणूस’ कुठे आहे, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
वाढवण बंदर, सागरी ताकद, जागतिक गुंतवणूकदारांचा विश्वास—हे सगळे ऐकताना अभिमान वाटतो, पण —“स्वप्न बघा, जरूर बघा; पण झोपेत चालू नका.” ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होणे ही घोषणा आहे, पण ती लोकांच्या जीवनात बदल घडवेल का, हा खरा मापदंड आहे. विकासाचा वेग सुसाट असावा, पण दिशा चुकली तर अपघात होतो. महाराष्ट्राला वेग हवा, पण त्याहून जास्त समतोल, पारदर्शकता आणि जमिनीवरचा विकास हवा—हे वास्तव नजरेआड करून चालणार नाही.
