महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ जानेवारी । ‘गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या संपामुळे एसटीचा ग्रामीण आणि शहरी भागाशी संपर्क तुटला आहे. प्रवासी हैराण झाले आहेत. कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्क मागण्याचा अधिकार आहे. पण त्यासाठी कोणालाही वेठीस धरू नका. संप मागे घ्या. कामावर परत या.’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना केले. कोणावरही कारवाई होणार नाही असे आश्वस्त करतानाच मागण्या किती ताणाव्यात याचेही तारतम्य ठेवा, असेही त्यांनी बजावले. संपकरी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज पवार यांची भेट घेतली. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.
विलीनीकरणाच्या प्रमुख मागणीसह अन्य काही मागण्यांसाठी मागील दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. आता त्यामध्ये तोडगा काढण्यासाठी खासदार शरद पवार व अनिल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर प्रदीर्घ बैठक झाली. या बैठकीला एसटीतील बावीस कर्मचारी संघटनांच्या कृती समितीचे प्रमुख नेते होते. या बैठकीत शरद पवार व अनिल परब यांनी कामगार नेत्यांशी सविस्तर चर्चा करून त्यांचे सर्व प्रश्न व मागण्या समजावून घेतल्या. कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही आणि सर्व प्रश्न चर्चेअंती सोडवण्याचे आश्वासन देत संप मागे घेण्याचे आवाहन या दोन्ही नेत्यांनी केले.