महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ जानेवारी । मुंबई, ठाण्यासह पुणे, पिंपरी चिंचवड व अन्य काही महानगरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शालेय वर्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत. सदर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’ अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोमवारी दिले.
राज्यामध्ये पहिली ते बारावीच्या शाळा टप्याटप्याने सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु कोरोनाचा पुन्हा एकदा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ऑफलाइन वर्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत. दहावी, बारावीसह सर्वच शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा साधारणतः मार्च महिन्यात सुरू होतात. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा बंद असल्या तरीही शिक्षण सुरू राहिले पाहिजे, या धोरणानुसार ऑनलाइन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सध्यस्थिती ऑनलाइन शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांनी योग्य ती कार्यवाही करावी व ऑनलाइन शाळांची संख्या, उपस्थित विद्यार्थी, अनुपस्थित विद्यार्थी संख्या याची माहिती दररोज शासनास सादर करावी, असे निर्देश वर्षा गायकवाड यांनी शालेय शिक्षण आयुक्तांना दिले आहेत.