निर्बंध लावा, पण पर्यटनस्थळे सरसकट बंद करू नका; व्यावसायिकांची आदित्य ठाकरेंकडे मागणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ जानेवारी । राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्यामुळे पर्यटनस्थळे बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण ऐन हंगामात बंदी लागू केल्यास या क्षेत्रावर आधारित अर्थचक्र पूर्णतः ठप्प होण्याची भीती आहे. त्यामुळे सरसकट बंदीऐवजी निर्बंधांसह व्यवसाय करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी व्यावसायिकांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.

पर्यटनस्थळे बंद केल्यामुळे गाईड, कार-बस आणि टॅक्सी ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर, हस्तकला आणि पर्यटन उद्योगातील सर्व भागधारकांवर आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या नकारात्मक प्रभाव पडेल. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे सुनीत कोठारी यांनी केली आहे.

दुसऱ्या लाटेचा जोर ओसरल्यानंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनास पोषक वातावरण निर्माण झाले. नोव्हेंबरनंतर अर्थचक्र पूर्वपदावर येण्याची चिन्हे निर्माण झाली. परंतु, ओमायक्रॉन आणि वाढत्या रुग्णसंख्येने त्यात आडकाठी निर्माण केली आहे. त्यात राज्य शासनाने पर्यटनस्थळांवर सरसकट बंदी लागू केल्याने मारक स्थिती निर्माण झाल्याचे पर्यटन व्यावसायिक रुद्रेश पंडित यांनी सांगितले.
राज्य शासनाचा निर्णय जाहीर होताच अनेकांनी सहलीचे बेत रद्द केले आहेत. आयत्यावेळी लॉकडाऊन लागल्यास अडकून पडण्याची भीती काही जणांना आहे. त्यामुळे सहली रद्द होण्याचे प्रमाण वाढले आहे, असे सहल आयोजक रवींद्र पाटील यांनी सांगितले.

अजिंठा आणि वेरूळ लेणी पर्यटकांना खुली करण्यासाठी मी मंत्रालय स्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. शिवाय पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडेही पर्यटन व्यवसायावर आधारित घटकांची कैफियत मांडली आहे.
– सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी, औरंगाबाद
टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *