महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ११ जानेवारी । दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी बांगलादेशने जिंकल्यानंतर न्यूझीलंडने दुसरी कसोटी जिंकत हिशेब चुकता केला. न्यूझीलंडच्या भूमीवर त्यांनाच पराभूत करत बांगलादेशने यजमानांना धक्का दिला होता. पण दुसऱ्या कसोटीत ‘टेस्ट चॅम्पियन्स’नी दमदार खेळ करत संघाला एकतर्फी मोठा विजय मिळवला. महत्त्वाची बाब म्हणजे, पहिल्या कसोटीत पराभवाचा धक्का देणाऱ्या बांगलादेशी खेळाडूंना न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटीत अवघ्या तीन दिवसात धूळ चारली.
५०० हून जास्त धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ पहिल्या डावात १२६ धावांवर बाद झाला. त्यानंतर सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेशचा दुसरा डाव सुरू झाला. या डावातही न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी बांगलादेशी फलंदाजांना चांगलंच नाचवलं. फॉलो-ऑनचा डाव सुरू केल्यानंतर ८० षटकांचा खेळ रंगला. पण अखेर २७८ धावांवर बांगलादेशचा दुसरा डावही आटोपला आणि न्यूझीलंडने १ डाव व ११७ धावांनी दुसरी कसोटी जिंकली.
What a way to finish the Test! @RossLTaylor takes his THIRD Test wicket to finish the Test inside 3 days at Hagley Oval. We finish the series 1-1 with @BCBtigers. #NZvBAN pic.twitter.com/2GaL0Ayapr
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 11, 2022
रॉस टेलरने विजयी विकेट घेऊन संपवलं कसोटी करियर!
पहिल्या डाव अतिशय सुमार कामगिरी करणाऱ्या वरच्या आणि मधल्या फळीतील बांगलादेशी फलंदाजांना दुसऱ्या डावात चांगली सुरूवात मिळाली. पण मोठी खेळी करणं कोणालाच जमलं नाही. केवळ लिटन दासने ११४ चेंडूंचा सामना करत १०२ धावा केल्या. त्यात १४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. तो वगळता इतर कोणत्याच खेळाडू अर्धशतकही साजरं करता आलं नाही. त्यामुळे बांगलादेशला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. कायल जेमिसनने ४, नील वॅगनरने ३, टीम सौदी आणि डॅरेल मिचेलने १-१ बळी टिपला. पण महत्त्वाची बाब म्हणजे, आपला शेवटचा कसोटी सामना खेळत असलेल्या रॉस टेलरने दहावा बळी टिपत संघाला विजय मिळवून दिला आणि आपल्या कसोटी कारकिर्दीला यशस्वी पूर्णविराम दिला. त्याने केवळ ३ चेंडू टाकले त्यातच त्याने शेवटचा गडी बाद केला. हा त्याचा कसोटी कारकिर्दीतील केवळ तिसराच बळी ठरला.