आयसीएमआरची कोरोना चाचणीसाठी नवी नियमावली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ११ जानेवारी । संपूर्ण जगावर घोंघावणाऱ्या कोरोनाच्या दुष्ट संकटाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने देशातही आपले हातपाय पसरले आहेत. देशात एकंदरीतच कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. प्रशासन याच पार्श्वभूमीवर सतर्क झाले असून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान सोमवारी केंद्र सरकारकडून कोरोना चाचणीबाबत नवी नियमावली जारी केली आहे. एखाद्या व्यक्तीला जर कोरोनाची लागणी झाली असेल, तर त्याच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. पण, आता आयसीएमआरच्या नव्या नियमावलीनुसार कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी करण्याची गरज नाही.

कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तीच्या कोरोना चाचणीबाबत आता आयसीएमआर अर्थात इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने नवी नियमावली जारी केली आहे. जर एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्याच्या संपर्कातील लोकांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. पण, आता कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी करण्याची गरज नाही. कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीला जास्ती धोका नसेल अशाच व्यक्तींसाठी हा निर्णय आहे. पण, ज्यांचे वय जास्ती आहे किंवा त्यांना अन्य आजार आहे, त्यांना कोरोना चाचणी करावी लागणार आहे.

देशातील कोरोनाबाधितांची रोज नवीन आकडेवारी समोर येत आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांनी त्वरित चाचण्या करून घेण्याच्या सूचना आजवर देण्यात येत होत्या. पण आयसीएमआरने आता अशा सरसकट चाचण्यांना कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीएमआरने यासंदर्भात नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चाचणी करण्याची गरज नसल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे. त्याचबरोबर सहव्याधी असलेली व्यक्ती किंवा वृद्ध व्यक्ती रुग्णाच्या संपर्कात असेल तर केवळ त्यांची चाचणी गरजेची असल्याचे केंद्राने म्हटले आहे. व्याधीने ग्रासलेल्या व्यक्तींना लवकर विलगीकरणात ठेवून त्यांच्यावर उपचार करण्याच्या सूचनाही आयसीएमआरने दिल्या आहेत. सध्या कोरोनाची आकडेवारी वाढत असली, तरी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे, पण कुणीही गाफील न राहण्याचा सल्ला आयसीएमआरने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *