महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १७ जानेवारी । आज (सोमवारी) पिंपरीतील फुगेवाडी मेट्रो स्टेशनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राज्यसभा खासदार शरद पवार यांनी अचानक भेट दिली आहे. पवार यांनी यावेळी फुगेवाडी ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिका असा मेट्रो प्रवासाचा आनंद लुटला आहे. पुणे मेट्रोचे काम सध्या गतीने सुरू आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमध्ये तर मेट्रोच्या यशस्वी चाचण्या पार पडल्या आहेत. पिंपरी-चिंचवडमधील ही मेट्रो प्रवाश्यांच्या सेवेसाठी सज्ज आहे. दरम्यान शरद पवार यांनी आज मेट्रोने प्रवास केल्याचे पाहायला मिळाले.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रोचे काम कोरोनाच्या महामारीत बंद पडले होते. केव्हा त्या कामाला गती मिळणार याकडे सर्व पुणेकरांचे लक्ष होते. दरम्यान, मधील काळात पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या 6 किलोमीटर प्राधान्य मार्गावर मेट्रोची चाचणी यशस्वी झाली होती. त्यामुळे ती आता मेट्रो प्रवाशांसाठी सज्ज असणार आहे. यातच आज शरद पवार यांनी फुगेवाडी स्टेशनला भेट दिली, तेव्हा त्यांनीही मेट्रोतून प्रवास केला.
दरम्यान, गतवर्षी पुणे महामेट्रोच्या पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालय ते फुगेवाडी मार्गाचे 90 टक्के काम पूर्ण झाले होते. पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालय ते फुगेवाडी मार्गावर 2022 च्या जानेवारीमध्ये आणि फेब्रुवारीत मेट्रो धावणार होती. पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालय ते फुगेवाडी मार्गावर महामट्रो सुरूवातीला रोज पद्धतीने चालवली जाणार असल्याचे त्यावेळी म्हटले होते. तर, पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालय ते फुगेवाडी या मार्गावर एकूण 5 स्टेशनचा समावेश आहे. लवकरच नागरिकांना या मेट्रोने प्रवास करता येणार आहे.