महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ जानेवारी । वीज बिल थकबाकीचा सामना करणाऱ्या महावितरणला काहीसा दिलासा मिळाला आहे. कृषीपंप वीजजोडणी धोरण योजनेंतर्गत राज्यातील 1280 गावांमधील शेतकऱ्यांनी आपल्या वीज बिलाची संपूर्ण थकबाकी भरली आहे. वीज बिलाची थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 3 लाख 75 हजार 254 एवढी मोठी आहे. आर्थिक चणचणीत सदरच्या शेतकऱ्यांनी सुमारे 2 हजार 63 कोटी रुपयांचा भरणा केला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांकडे जवळपास 45 हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. सदरच्या थकबाकी वसुलीसाठी कृषीपंप वीजजोडणी धोरण आणले आहे. त्यासाठी थकीत वीज बिलाच्या रकमेत सुमारे 66 टक्के सवलत जाहीर केली आहे. याचा लाभ घेत 3 लाख 75 हजार शेतकऱयांनी घेतल्याने 1280 गावे वीज बिल थकबाकीमुक्त झाली आहेत. तसेच 19 लाख 58 हजार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला आहे. 31 मार्चपर्यंत चालू बिल व सुधारित थकबाकीची 50 टक्के रक्कम भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ होणार आहे.