Jay Bhim | सूर्याच्या ‘जय भीम’ चित्रपटाचा जगभरात डंका, आता थेट ऑस्करच्या शर्यतीत

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ जानेवारी । संपूर्ण भारतभर चर्चा झालेला टी. जे. ज्ञानवेल दिग्दर्शित ‘जय भीम’ (Jay Bhim) चित्रपटाची आता विदेशातही चर्चा होत आहे. जय भीम चित्रपट आता थेट ऑस्कर पुरस्कार स्पर्धेसाठी निवडला गेला आहे. जय भीमसोबत प्रियदर्शन दिग्दर्शित मरक्कर या दाक्षिणात्य चित्रपटाचादेखील 94 व्या ऑस्कर (Oscar Award) पुरस्कार स्पर्धेत प्रवेश झाला आहे. जय भीम चित्रपटाने अतिशय वेगळ्या आणि दुर्लक्षित अशा विषयाला हाताळलेले आहे. याच कारणामुळे या चित्रपटाची देशभरात चर्चा झाली. मात्र आता हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत पोहोचला असून हेच या चित्रपटाचे यश आहे, असे म्हटले जात आहे.

यावेळी जगभरातील 276 चित्रपट ‘ऑस्कर’ पुरस्कारांसाठी खुल्या विभागात स्पर्धेत आहेत. या यादीत ‘जय भीम’ आणि ‘मरक्कर’ चित्रपटांचाही समावेश आहे. ‘जय भीम’ हा तमिळ सिनेमा भारतात 2 नोव्हेंबर 2021 रोजी ओटीटीवर प्रदर्शित झालेला आहे. चित्रपटाचे कथानक 90 च्या दशकातील तमिळनाडूमध्ये घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. दाक्षिणात्य अभिनेता सूर्या यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. प्रदर्शनानंतर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. राजकीय वादालाही या चित्रपटाला तोंड द्यावे लागले होते.
तमिळनाडूतील आदिवासींना न्याय मिळवून देणाऱ्या वकिलाची ही कथा आहे.

तसेच प्रियदर्शन दिग्दर्शित आणि मोहनलाल अभिनित ‘मरक्कर’ या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या चित्रपटाचाही ऑस्कर पुरस्कार स्पर्धेत समावेश झाला आहे. खुल्या विभागात निवड झालेल्या 276 चित्रपटांची यादी ऑस्करच्या संकेतस्थळावर गुरुवारी जाहीर करण्यात आली. त्यात या दोन्ही चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार स्पर्धेसाठी नामांकन मिळवणाऱ्या चित्रपटांची अंतिम यादी 8 फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *