PM Modi: ‘…म्हणून बाळासाहेब कायम स्मरणात राहतील’; पंतप्रधानांनी जागवल्या आठवणी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २३ जानेवारी । शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती असून राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून बाळासाहेबांचे पूण्यस्मरण केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीटरच्या माध्यमातून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे व त्यांच्या नेतृत्वाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. ( PM Modi Pays Homage To Balasaheb Thackeray )

बाळासाहेबांचा आज ९६वा जन्मदिन असून यानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळी सकाळपासूनच शिवसेना नेते व शिवसैनिक दाखल होत आहेत. त्याचवेळी विविध राजकीय पक्षांचे नेते सोशल मीडियाच्या माध्यमातून बाळासाहेबांना आदरांजली वाहत आहेत. पंतप्रधान मोदी यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला. पंतप्रधानांनी आपल्या वैयक्तिक ट्वीटर हँडलवरून ट्वीट केले असून बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली आहे. ‘स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. सदैव जनतेच्या पाठीशी उभा राहणारा उत्कृष्ट नेता म्हणून बाळासाहेब कायम स्मरणात राहतील’, अशा भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.

बाळासाहेब आणि मोदींचं नातं जिव्हाळ्याचं राहिलं. गुजरातमध्ये दंगली उसळल्या तेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी मोदींच्या मुख्यमंत्रिपदावर टांगती तलवार होती. मोदींना हटवण्याची तयारी पक्षनेतृत्वाने केली होती. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हे मोदींच्या पाठीशी उभे राहिले होते. मोदींना हटवले तर गुजरात हातचे जाईल, असे त्यांनी भाजप नेतृत्वाला सांगितले होते. मोदींनीही नेहमीच बाळासाहेबांचा आदर केला. मातोश्री निवासस्थानीही मोदी बाळासाहेबांच्या भेटीला आले होते. तसेच वेळोवेळी मोदींनी जाहीरपणे बाळासाहेबांच्या नेतृत्वाबद्दल गौरवोद्गार काढलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *