डोक्यावरचा केशसंभार दीर्घकाळ टिकावा असे वाटते ? मग ही पथ्ये पाळा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२६ जानेवारी । वयोमानानुसार केस कमी होतात. शिवाय आपल्या डोक्यावरचे केस किती वर्षे टिकावेत हे अनुवांशिक सुद्धा असते. केसांचे आरोग्य हवामानावर सुद्धा अवलंबून असते. म्हणजे आपल्या डोक्यावरचा केशसंभार दीर्घकाळ टिकावा असे आपल्याला कितीही वाटले तरी ते वय, अनुवांशिकता आणि हवामान यावर अवलंबून असते. ते आपल्या हातात नसते. मात्र काही तज्ज्ञांनी केसांचे नुकसान होऊ नये यासाठी आपल्या हातात असलेली काही पथ्ये सांगितली आहेत. ती पथ्ये पाळली की मात्र आपण केसाचे काही प्रमाणात का होईना संरक्षण करू शकतो.

गरम पाण्याची आंघोळ सर्वांनाच आवडते, परंतु फार गरम पाण्याने केस धुऊ नयेत. केस कोरडे होतात आणि कोरडे केस लवकर गळून पडतात. तेव्हा केस धुताना कोमट पाण्याने धुवावे. फार गरम पाणी केवळ केसांनाच नव्हे तर केसाखालच्या कातडीला सुद्धा घातक असते. केस विंचरण्याच्या पद्धतीत सुद्धा काही वेळा दोष असतो. फार घासून केस विंचरू नये आणि त्यात जोरजोराने ब्रश फिरवू नये. तसा तो फिरवल्याने केसांची मुळे ढिली होतात. काही लोक केस वाळवण्यासाठी त्यांना घसाघसा पुसतात. तसे पुसण्याऐवजी त्यांना आपोआप वाळू द्यावे.

चेहर्‍याचे सौंदर्य वाढविण्यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या केशरचना केल्या जातात. परंतु त्या केशरचना करताना केसांची फार ओढाताण करू नये. केस उलटे पालटे करावे लागतील अशी केशरचना टाळावी. केस घट्ट बांधू नयेत. केशरचना करण्यासाठी, केस वाळवण्यासाठी किंवा केसांना आकार देण्यासाठी विजेवर चालणार्‍या उपकरणांचा वापर टाळावा. किंबहुना अशी उपकरणे शक्यतो वापरूच नयेत.

केस गळण्याचे एक मुख्य कारण म्हणजे तेलाचा वापर न करणे. काही लोकांना केसांना तेल न लावणे योग्य वाटते. सध्या तर काही तरुण लोक केसांना कधीच तेल लावत नाहीत. तसे ते लावले की ते चेहर्‍यावर उतरते म्हणून केसाला तेल लावणे टाळले जाते. पण तेल मिळाले नाही तर केस फार वेगाने गळू शकतात हे लक्षात ठेवले पाहिजे. तेल लावताना केसांना एक प्रकारचा मसाज होत असतो, तो त्वचेला आणि केसांना दोघांना उपयोगी पडत असतो. केसांचे आरोग्य पोटावर सुद्धा अवलंबून असते. फार कडक उपवास करणार्‍यांचे केस लवकर गळत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *