ग्राहकांना 28 नाही तर 30 दिवसांच्या वैधतेचा प्री-पेड रिचार्ज प्लॅन द्या, TRAI चा आदेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २८ जानेवारी । टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) ग्राहकांच्या हितासाठी मोठा निर्णय घेतला आहे. TRAI ने अलीकडेच टेलिकॉम टॅरिफ (66 वी सुधारणा) आदेश जारी केला आहे. यानुसार टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्संना (टीएसपी) 28 दिवसांऐवजी 30 दिवसांच्या वैधतेसह रिचार्ज प्लॅन जारी करण्याचे आदेश दिले आहेत. TRAI च्या नवीन आदेशानुसार, टेलिकॉम कंपन्यांना अधिसूचना जारी केल्यापासून 60 दिवसांच्या आत 30 दिवसांच्या वैधतेसह प्लॅन ऑफर करावे लागतील.

TRAI च्या नवीन आदेशानुसार, प्रत्येक टेलिकॉम कंपन्यांनी किमान एक प्लॅन व्हाउचर, एक स्पेशल टॅरिफ व्हाउचर आणि एक कॉम्बो व्हाउचर ऑफर केले पाहिजे, ज्याची वैधता 28 दिवसांऐवजी 30 दिवस आहे. जर ग्राहकाला या प्लॅन्सचे पुन्हा रिचार्ज करायचे असेल तर ते सध्याच्या प्लॅनच्या तारखेपासून ते करू शकतात, अशी तरतूद असावी.

दरम्यान, टेलिकॉम कंपन्या महिनाभर पूर्ण रिचार्ज देत नसल्याची तक्रार युजर्सनी अलीकडेच केली होती. टेलिकॉम कंपन्या महिन्यातील 30 दिवसांऐवजी 28 दिवसांच्या वैधतेसह प्लॅन ऑफर करत आहेत, त्यानंतर TRAI ने टेलिकॉम कंपन्यांना 30 दिवसांच्या वैधतेसह रिचार्ज प्लॅन सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.

रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया सारख्या खाजगी टेलिकॉम कंपन्या एका महिन्याच्या रिचार्जच्या नावावर ग्राहकांना 30 ऐवजी 28 दिवसांची वैधता देतात, अशी तक्रार होती. ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, दर महिन्याला 2 दिवस वजा करून, कंपन्या वर्षातील जवळपास 28 दिवसांची बचत करतात. अशा प्रकारे, टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना वर्षात 12 ऐवजी 13 महिन्यांसाठी रिचार्ज करायला लावतात. याचप्रमाणे, दोन महिन्यांच्या रिचार्जमध्ये 54 किंवा 56 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. तर तीन महिन्यांच्या रिचार्जमध्ये 90 दिवसांऐवजी 84 दिवसांची वैधता दिली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *