महाराष्ट्र २४; ऑनलाईन ; औरंगाबाद ; काेराेना व्हायरसची लागण सुरू असताना आता औरंगाबाद शहर व जिल्ह्यात स्वाइन फ्लूचेही रुग्ण सापडत आहेत. त्यावरून ही साथही सुरूच असल्याचे चित्र आहे. काेराेना संशयितांची तपासणी सुरू असताना गेल्या दाेन दिवसांत शहरात स्वाइन फ्लूचे दाेन पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यापैकी एकाला घाटीत दाखल केले आहे. दरम्यान, स्वाइन फ्लूची साथ अगोदरपासूनच सुरू आहे. केवळ रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने त्याची तीव्रता दिसत नाही, अशी माहिती घाटीतील डॉक्टरांनी दिली आहे. फेब्रुवारीतही मेडिसीन विभागात स्वाइन फ्लूचे दाेन रुग्ण दाखल झाले होते.
घाटीत अजूनही स्वाइन फ्लूचा आयसोलेशन वाॅर्ड सुरू आहे. या वाॅर्डात ऑगस्टमध्ये तीन, त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये दोन रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली आहे. अनेकदा प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे या व्हायरसचा अटॅक लवकर होतो. याबाबत फिजिशियन असोसिएशनचे अध्यक्ष संजय पाटणे यांनी सांगितले की, ‘स्वाइन फ्लूची साथ अजूनही सुरूच आहे. त्याचे रुग्ण अधूनमधून येतात. कोरोना, स्वाइन फ्लूची लक्षणे काही प्रमाणात सारखी आहेत. मात्र, स्वाइन फ्लूवर टॅमी फ्लूच्या गोळ्यांच्या माध्यमातून यशस्वी उपचार केले जात आहेत.’