महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ फेब्रुवारी । रत्नागिरी । राज्यात सुमारे तीन महिने सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनावर अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही. हा तोडगा नक्की कधी निघणार असून वाहतूक कधी सुरू होणार असा सवाल सामान्य प्रवासी आणि विद्यार्थी विचारत आहेत. महाविकास आघाडीकडे तीन पक्षांचे बळ असतानाही यातून मार्ग का काढला जात नाही, असे प्रवासी बोलू लागले आहेत. सत्ताधाऱ्यांनी एसटी महामंडळाला वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे कर्मचारीसुद्धा आता वेगवेगळे व्यवसाय करू लागल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात हजर कर्मचाऱ्यांचा आकडा ७०० च्या पुढे जात नाहीये. त्यामुळे वाहतूक सुरळित करणे अशक्यप्राय गोष्ट आहे. जिल्ह्यात सुमारे १० टक्के वाहतूक सुरू आहे. काही बसस्थानकांतून वाहतूक बऱ्यापैकी चालू झाली आहे. परंतु अजूनही चालक, वाहक आणि चालक तथा वाहक कर्मचारी हजर झालेले नाहीत.
त्यामुळे संप मिटल्याशिवाय ही वाहतूक सुरळित होणार नाही. कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्यात आली आहे, परंतु ही पगारवाढ मान्य नसून शासनात विलीनीकरण याच मुद्द्यावर कर्मचारी अडून बसले आहेत.मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या मान्यतेबाबत प्रकरण दाखल आहे. तसेच अन्य संघटनाही संपात आहेत. परंतु रत्नागिरीमध्ये सर्व कामगार एकत्र आले आहेत आणि काम बंद आंदोलन सुरू आहे. कोणत्याही संघटनेने पुढाकार घेतलेला नाही. दोन दिवस विविध मान्यवरांनी भेटी घेत कर्मचाऱ्यांच्या बाजून असल्याचे सांगितले आहे. परंतु आंदोलन कोणत्याही स्थितीत मागे घ्यायचे नाही, असा निश्चय कर्मचाऱ्यांनी केला आहे.
शहरी व ग्रामीण फेऱ्या बंद असल्याने शालेय विद्यार्थ्यांना खासगी वाहतुकीकडे वळावे लागले आहेत. तसेच खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले जात आहेत. परंतु वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या दरामुळे कमी दरात नेण्याकरिता जादा प्रवासी नेण्यात येतात. तसेच वाहतुकीसाठी दुसरे वाहन उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याच वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. एसटी बंदचा थेट फटका या विद्यार्थ्यांना बसत आहे.