काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना रोमित चव्हाण, संतोष यादव शहीद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १९ फेब्रुवारी । जम्मू आणि काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत रोमित तानाजी चव्हाण आणि संतोष यादव हे दोन जवान शहीद झाले आहेत. दरम्यान, चकमक अजूनही सुरू असून सुरक्षा दलाच्या जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. स्थानिक पोलीस आणि सुरक्षा दलांकडून सर्च ऑपरेशनही हाती घेण्यात आले आहे. ( Shopian Encounter Latest Breaking News )

शोपियानमधील झेनपोरा येथील चेरमर्ग गावात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झडली असल्याची माहिती काश्मीर झोन पोलिसांकडून देण्यात आली आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्याला सुरक्षा दलाकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात असून एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आलं आहे, असेही सांगण्यात आले.

संरक्षण दलाच्या प्रवक्त्यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे. झेनपोरा भागातील चेरमर्गमध्ये ही चकमक सुरू असून त्यात रोमित तानाजी चव्हाण आणि संतोष यादव असे दोन जवान शहीद झाले असल्याचे त्यांनी सांगितले. दोघेही राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात होते, असेही त्यांनी नमूद केले. सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाकडून चेरमार्ग गावात कसून तपासणी करण्यात येत होती. त्याचवेळी आधीपासून लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्याला सुरक्षा दलाकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.

‘क्रॉस फायरिंगदरम्यान राष्ट्रीय रायफल्सचे रोमित तानाजी चव्हाण आणि संतोष यादव हे दोन जवान गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तातडीने श्रीनगर येथील ९२ बेस रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्या दोघांचाही मृत्यू झाला’, अशी माहिती जम्मू आणि काश्मीर पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याची ओळख पटल्यास अधिक माहिती समोर येऊ शकणार असल्याचेही हा अधिकारी म्हणाला. चेरमर्ग भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्याआधारे लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने सर्च ऑपरेशन हाती घेतले. संशयास्पद ठिकाणं चारही बाजूंनी घेरण्यात आली. त्याचवेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याने धुमश्चक्री उडाली, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *