महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २३ फेब्रुवारी । देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील वातावरणात पुन्हा बदल होत आहे. सध्या उत्तर भारतात किमान तापमानात वाढ होत असली तरी सोसाट्याचा वारा वाहत आहे. तसेच काही ठिकणी पावसानं देखील हजेरी लावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा थंडी वाढली असल्याचे चित्र दिसत आहे. मागील चार पाच दिवसांपासून दिल्लीतील नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा हुडहुडी भरली आहे. दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दिल्ली, बिहार, पंजाबमध्ये जोरदार वारे वाहणार असून, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात देखील उन्हाची चाहूल लागली आहे. उन्हाचा चटका वाढल्याने थंडीपासून दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र
महाराष्ट्रात कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. राज्यात तापमानाचा पारा 35 अंशाच्या पुढे गेला आहे. बहुतांश जिल्ह्यात तापमान 30 अंशाच्या पुढे गेल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. गारठा कमी झाला आहे. पुढच्या काही दिवसात तापमानात आणखी वाढ होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, उत्तर मगाराष्ट्रात थंडीचा जोर कयम आहे.
दिल्ली
राजधानी दिल्लीत आज ढगाळ आकाश राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राजधानीत कमाल तापमान 26 अंश, तर किमान तापमान 13 अंश राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.