महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १ मार्च । युद्धाच्या ज्वाळा रशियापर्यंत पोहोचल्या आहेत. युरोप व अमेरिकेच्या निर्बंधांमुळे सोमवारी रुबल या रशियाच्या चलनात २६% घसरण झाली. एक अमेरिकी डॉलर आता १०५.२७ रुबलचा झाला, तो शुक्रवारी ८४ रुबलचा होता. एवढ्या मोठ्या घसरणीमुळे रशियाच्या सेंट्रल बँकेने व्याजदर ९.५०% वरून वाढवून २०% केला. रुबल आणखी घसरू नये म्हणून शेअर बाजार ५ दिवस बंद करण्यात आले. युरोपीय देशांनी रशियाच्या सेंट्रल बँकेचे ४५ लाख कोटी रुपये जप्त केले. या निर्णयानंतर रशियाच्या अर्थव्यवस्थेवरील संकट वाढले आहे. जर्मनी, इटलीसह युरोपच्या काही देशांनी सोमवारी रशियासोबतचा व्यापार पूर्णपणे थांबवण्याची घोषणा केली. त्यावर चीनने म्हटले की, आपण रशियाशी आर्थिक संबंध आणखी मजबूत करू.
युद्धाची रणनीती यशस्वी होत नसल्याने पुतीन यांच्यावर दबाव, त्यामुळे दिली अण्वस्त्र हल्ल्याची धमकी युक्रेनपेक्षा ५ पट मोठा रशिया आता अण्वस्त्र हल्ल्याबाबत का बोलत आहे? ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने संरक्षणतज्ज्ञांच्या हवाल्याने लिहिले आहे की, युक्रेनचे लष्कर आपल्याला प्रमुख शहरांत घुसण्यापासून रोखेल, अशी अपेक्षा रशियाला नव्हती. आता जाणारा प्रत्येक दिवस ३ मोठ्या अडचणी निर्माण करत आहे. पहिली- युद्धात रोज सव्वा लाख काेटी रुपये खर्च करावे लागत आहेत, ते दीर्घकाळापर्यंत शक्य नाही. दुसरी- युक्रेनचे नागरिक रशियन लष्करासमोर उभे राहिले आहेत. नागरिकांना लक्ष्य करत रशियन लष्कर पुढे गेले तर पुतीन यांचा नैतिक पराभव निश्चित आहे.
मग आता पुतीन अण्वस्त्रांचा वापर करू शकतात का?
‘द इकॉनॉमिस्ट’ने युरोपीय तज्ज्ञांच्या हवाल्याने लिहिले की, नाटो किंवा शेजारी देशांनी हस्तक्षेप करू नये यासाठी पुतीन आता फक्त घाबरवत आहेत. पण नाटो आणि अमेरिकेला असे वाटते की, रशियन लष्कराला युक्रेनने आणखी काही दिवसांपर्यंत रोखून ठेवले तर पुतीन अण्वस्त्रांचा मर्यादित वापर करू शकतात. तसे झाल्यास ही तिसऱ्या जागतिक महायुद्धाची सुरुवात असेल. संपूर्ण जग एकीकडे असेल आणि रशिया एकटा. कारण अशा स्थितीत चीनही रशियापासून दूर राहील.