महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २ मार्च । मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने राज्य सरकारने राज्यात लागू असलेले नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने आता नवी नियमावली जारी केली आहे. या नुसार राज्यातील नाट्यगृहे, सिनेमागृहे आणि हॉटेल्स 100 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
या जिल्ह्यांचा समवेश
कोरोनाची स्थिती सुधारत असलेल्या जिल्ह्यांचा समावेश ‘A’ श्रेणीत करण्यात आला असून उर्वरीत जिल्ह्यांचा समावेश ‘B’ श्रेणीत करण्यात आला आहे. A श्रेणीत मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर, कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश आहे.
निर्बंध शिथिल
या 14 जिल्ह्यात पूर्ण क्षमतेने हॉटेल्स, सिनेमा आणि नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच पर्यटन आणि धार्मिकस्थळेही पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नाट्य, सिनेमासह पर्यटन आणि हॉटेल व्यवसायालाही मोठा दिलासा मिळाला आहे. इतर जिल्ह्यात हॉटेल, सिनेमा आणि नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेनेच सुरू ठेवण्याची अट कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, निर्बंध शिथील करण्यात आले तरी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.
यामुळे घेतला निर्णय
राज्य सरकारने या 14 जिल्ह्यांना A श्रेणीत ठेवण्याचे कारण म्हणझे, या जिल्ह्यातील 90 टक्के लोकांना पहिला डोस मिळाला आहे. तर 70 टक्के लोकांना दुसरा डोस मिळालेला आहे. तसेच या जिल्ह्यांतील पॉझिटीव्हिटी रेट दहा टक्के आहे. तसेच ऑक्सिजन सपोर्टेड बेडची किंवा आयसीयूतील बेडची क्षमता 40 टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळेच निर्बंधात सूट देण्यात येत असल्याचे नियमावलीत म्हटले आहे.