Russia Ukraine War: रशिया सहा तास युद्ध थांबवणार ? भारतीय विद्यार्थ्यांना खारकिव्हमधून बाहेर काढण्यासाठी मोठा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ३ मार्च । रशिया आणि युक्रेनमध्ये पेटलेल्या युद्धाला आता आठवडा उलटला आहे. यादरम्यान, भारत सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना माघारी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी हवाई दलाचीही मदत घेतली जात आहे. यादरम्यान भारत सरकारने रशियासोबत एक महत्त्वपूर्ण करार केला आहे. खारकिव्हमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी रशियाने सहा तास युद्ध थांबवण्याची तयारी दर्शवली आहे. ही वेळ युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय लोकांना खारकिव्हमधून बाहेर काढून युक्रेनपासून जवळ असलेल्या देशांच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यासाठी देण्यात आली आहे.

युक्रेनच्या खारकिव्ह शहरामध्ये अद्यापही हजारो विद्यार्थी अडकलेले आहेत, अशी माहिती मिळत आहे. भारतीयांना तिथून बाहेर पडू दिले जात नाही आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी रात्री रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासी चर्चा केली होती. त्यावेळी मोदींनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी पुतीन यांनी या विद्यार्थ्यांना बाहेर आणण्यासाठी रशिया भारताला मदत करेल, असे सांगितले होते. दरम्यान, खारकिव्हमध्ये युक्रेनच्या सैन्याकडून भारतीय विद्यार्थ्यांचा वापर मानवी ढालीसारखा केला जात असल्याचा दावा केला जात आहे.

व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितले की, भारतीय विद्यार्थ्यांना युद्धक्षेत्रातून सुखरुप बाहेर काढण्यासाठी सर्व आवश्यक आदेश देण्यात आले आहेत. रशियन सैन्य याबाबत सर्वतोपरी प्रयत्न करेल. त्यांनी सांगितले की, रशियन सैन्याकडून खारकिव्हपासून रशियापर्यंत एक सुरक्षित कॉरिडॉर तयार करण्यात येण्याबाबत संकेत दिले होते. त्याच्याच पुढच्या दिवशी रशिया सहा तास युद्ध थांबवण्यासही तयार झाला आहे. दरम्यान, भारतीय दूतावासाने बुधवारी विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने खारकिव्ह सोडण्याची सूचना दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *