रुग्णालये-शाळाही उद्ध्वस्त… कारण बेसमेंटमध्ये होती नागरिकांसाठी बंकर्स, नागरिकांवरील हल्ल्यामुळे रशियन सैनिकांच्या डोळ्यांत अश्रू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ४ मार्च । युक्रेनवरील हल्ल्याच्या आठव्या दिवशी रशियाच्या क्रौर्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. खार्कीव्हमध्ये उतरलेल्या रशियन पॅराट्रुपर्सनी एका मोठ्या रुग्णालयावर क्षेपणास्त्रे डागली. यात ४ ठार, १० गंभीर जखमी झाले. जखमींत ६ कर्मचारी आहेत. दुसऱ्या घटनेतही अन्य रुग्णालयावर क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या घटनांबाबत डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, ‘रुग्णालयांवर हल्ला हा युद्धगुन्हा आहे.’

युक्रेनच्या लष्करानुसार, ज्या रुग्णालयांवर हल्ले झाले त्याच्या तळात बंकर्स आहेत. यात नागरिकांना ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे, आपण फक्त लष्करी ठिकाणांवर हल्ले करत असून अशी १६०० ठिकाणे उद्ध्वस्त केल्याचे रशियन लष्कराने म्हटले आहे.

रशिया व युक्रेनच्या लष्करात राजधानी कीव्हमध्ये तुंबळ युद्ध सुरू आहे. आतापर्यंत फक्त खेरसन शहर रशियाच्या ताब्यात येऊ शकले आहे. आपले ४५०० सैनिक ठार झाल्याचे रशियाने मान्य केले आहे. ७५४ नागरिक मारले गेले आहेत. जागोजाग युक्रेनी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्राँ यांच्याशी चर्चा केली. पुतीन म्हणाले,‘आम्ही युद्ध थांबवण्यास तयार आहोत, पण युक्रेनने काही गोष्टींसाठी राजी व्हावे.’ तिकडे, युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की म्हणाले, ‘आम्ही कुठलीही अट मानणार नाही.’ मॅक्राँ म्हणाले की, युक्रेनमध्ये विनाशाचा टप्पा अद्याप बाकी आहे. पुतीन यांना पूर्ण युक्रेनवर कब्जा हवा आहे. पुतीन म्हणाले, युक्रेनने ३ हजार भारतीय व चिनी विद्यार्थ्यांना बंधक बनवले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले, युक्रेनमध्ये एकही भारतीय बंधक नाही.

युक्रेनमध्ये दाखल या रशियन सैनिकांना सांगण्यात आले होते की, आपण युद्धसराव करतो आहोत. यादरम्यान हल्ल्याचे आदेश आले. हे सैनिक युक्रेनमध्ये दाखल झाले खरे; परंतु नागरिकांवरील हल्ल्यांमुळे त्यांचे मनोबल ढासळले. युक्रेनमध्ये त्यांना नागरिकांनी अनेक ठिकाणी अडवले. सैनिकांच्या हाती फोन देऊन कुटुंबीयांशी बोलणे करून दिले. तेव्हा हे सैनिक ओक्साबोक्शी रडू लागले. युक्रेनमध्ये अनेक शहरांत ही स्थिती आहे.

कीव्ह व खार्कीव्हमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना रशियन नियंत्रणाखालील भागातून रशियात पोहोचवण्याची तयारी असल्याचे आश्वासन रशियाने भारत सरकारला दिले आहे. तेथून ते भारतात परतू शकतील. रशियन परराष्ट्र मंत्रालयाने भास्करला सांगितले, ‘युक्रेनमध्ये रस्ते मार्गावर आमचे हल्ले सुरू नाहीत. युद्धक्षेत्रात अडकलेल्या भारतीयांना अगोदर रशियात आणावे, हा आमचा प्रयत्न आहे. आमच्या विमानांनी त्यांना भारतात पाठवण्यास आम्ही तयार आहोत. भारतीय अधिकाऱ्यांसोबत मार्गांची चर्चा सुरू आहे. ’

खार्कीव्हमधील १७०० विद्यार्थी ४० किमी दूर रशियन सीमेकडे पायी निघाले आहेत. ५ दिवसांत ३,३५२ भारतीयांना मायदेशी आणण्यात आले. ४ हजार शुक्रवारी येतील. ८ हजार लोक युद्धापूर्वीच परतले होते. ३ हजार लोक अजून युक्रेनमध्ये आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *