Russia Ukraine War : युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला निर्वाणीचा इशारा ; “…तर तो युरोपचा शेवट असेल”,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ४ मार्च । रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अण्वस्त्र सेनेला देखील सज्ज राहाण्याचे निर्देश दिल्यानंतर अणुयुद्धाचा देखील धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज युक्रेनमधील एनरहोदर भागात असलेल्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर रशियन सैन्याकडून गोळीबार करण्यात आला आहे. या अणुऊर्जा केंद्रावर आग लागली असून त्यामुळे आता इथे स्फोट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी यासंदर्भात आता निर्वाणीचा इशारा दिला आहे.

वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी युक्रेनमधील अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला झाल्यानंतर त्यासंदर्भात तातडीचा व्हिडीओ संदेश जारी केला आहे. या संदेशामध्ये झेलेन्स्की यांनी जगाला गंभीर इशारा दिला आहे. “जर या अणुउर्जा केंद्रावर स्फोट झाला, तर तो सर्वांचा शेवट असेल. तो युरोपचा शेवट असेल. संपूर्ण युरोप रिकामा करावा लागेल”, असं झेलेन्स्की म्हणाले आहेत.

“युरोपनं तातडीनं यासंदर्भात पावलं उचलली, तरच रशियन फौजा थांबतील. एका अणुऊर्जा प्रकल्पावर स्फोट झाल्यामुळे युरोपचा मृत्यू होऊ देऊ नका”, असं देखील झेलेन्स्की यावेळी म्हणाले.

रशियन सैन्याने युक्रेनमधील युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा केंद्रावर गोळीबार करण्यास सुरुवात केली आहे. हा प्रकल्प एनरहोदर येथे आहे, नीपर नदीवरील शहर आहे जे देशाच्या वीज निर्मितीच्या एक चतुर्थांश भाग आहे. प्लांटच्या प्रवक्त्याने सांगितले की गोळीबार शुक्रवारी पहाटे सुरू झाला. रशियन सैन्याने गुरुवारी युरोपमधील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या युक्रेनियन शहराच्या नियंत्रणासाठी लढा दिला आणि युक्रेनियन नेत्यांनी नागरिकांना गनिमी युद्ध पुकारण्याचे आवाहन केलं आहे.

झेलेन्स्कींचं पुतिन यांना चर्चेचं आवाहन
दरम्यान, युद्ध संपवण्यासंदर्भात झेलेन्स्की यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना समोरासमोर बसून चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे. “आम्ही रशियावर हल्ला केलेला नाही. आम्ही हल्ला करण्याची योजनाही बनवत नाहीय. तुम्हाला आमच्याकडून काय हवंय? आमच्या जमीनीवरील ताबा सोडा,” असं झेलेन्स्की यांनी पुतिन यांना आवाहन केल्याचं एएफपी या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तात म्हटलंय. “माझ्यासोबत बसा. आपण अगदी एकमेकांपासून ३० मीटरवर (जसे तुम्ही फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत बसला होता तसे) बसून बोलूयात,” असं झेलेन्स्कींनी म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *