महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ४ मार्च । पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार लवकरच कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. सरकार फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करून केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन १८ हजार रुपयांवरून थेट २६ हजार रुपये करण्याची घोषणा करू शकते. फिटमेंट फॅक्टर २.५७ वरून ३.६८ पट करण्याची मागणी सरकारी कर्मचारी काही वर्षांपासून करत आहेत. त्यांची ही मागणी येत्या काही महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचे कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर सरकार अनेक महिन्यांपासून विचार करत आहे. मात्र सध्या निवडणुका असल्याने हा निर्णय घेण्यास विलंब होत आहे. सरकार कर्मचाऱ्यांना होळीची भेट म्हणून फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे.फिटमेंट फॅक्टर सर्व केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन ठरवते. फिटमेंट फॅक्टर शेवटचा २०१६मध्ये वाढविण्यात आला होता, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन सहा हजार रुपयांवरून १८ हजार रुपये करण्यात आले होते.फिटमेंट फॅक्टरमधील संभाव्य वाढीमुळे २६ हजार किमान मूळ वेतन मिळू शकते. म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांना मूळ वेतनात थेट ८ हजार रुपयांची वाढ मिळणार आहे.
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, फिटमेंट फॅक्टर २.५७ आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार निश्चित करताना, महागाई भत्ता (डीए), प्रवास भत्ता (टीए), घरभाडे भत्ता (एचआरए) इत्यादी भत्त्यांचा समावेश असतो.कर्मचाऱ्यांचा मूळ पगार सातव्या वेतन आयोगाच्या फिटमेंट फॅक्टर २.५७ने गुणाकार करून काढला जातो.मूळ वेतन २६ हजारपर्यंत वाढविल्यास महागाई भत्ताही वाढेल. महागाई भत्ता (डीए) मूळ वेतनाच्या ३१ टक्के इतका आहे. मूळ वेतनात वाढ झाल्यामुळे महागाई भत्ता वाढेल. मूळ वेतन थेट ८ हजार रुपये प्रतिमहिना आणि वार्षिक ९६ हजार रुपये वाढेल. याचा फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे.