![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ४ मार्च । सोने दर आज 52,000 रुपये प्रति 10 ग्रॅम पार गेला आहे. मागील काही दिवसांपासून सोने दरात (Gold Rate) सतत तेजी आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज एप्रिल डिलीव्हरी सोन्याच्या दरात 0.45 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या किंमतीतही (Silver Price) 0.54 टक्क्यांची वाढ झाली आहे.
सोन्याचा वाढता दर पुन्हा एकदा आपल्या रेकॉर्ड स्तराजवळ वळतो आहे. ऑगस्ट 2020 मध्ये मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर होता.
एप्रिल डिलीव्हरी सोन्याचा दर आज 0.45 टक्क्यांच्या वाढीसह 52,005 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. आज चांदीच्या दरात 0.54 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीसह एक किलो चांदीचा दर 68,270 रुपये आहे.
तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
जगभरातील शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण आहे. त्यामुळे गुंतवणुकदार पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळले असल्याचं चित्र आहे.
सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.