महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१४ मार्च । रशियन सैन्याचे युक्रेनवरील हल्ले नाटो सदस्य पोलंडच्या सीमेपर्यंत पोहोचले आहेत. पश्चिम युक्रेनमध्ये पोलंडच्या सीमेपासून ३५ किमी दूर यावाेरिव्ह लष्करी तळावर रशियाने ३० क्षेपणास्त्रे डागली. यात ३६ जणांचा मृत्यू झाला, तर शंभरावर जखमी झाले. या तळावर नाटो लष्कराला प्रशिक्षण दिले जाते. पश्चिमेतील लष्करी शिपमेंटला निशाणा बनवण्याची धमकी रशियाचे परराष्ट्र उपमंत्री सर्गेई रायबकाेव्ह यांनी दिली.
रशियन हल्ल्यांत रविवारी अमेरिकन पत्रकार ब्रेंट रेनॉड यांचा मृत्यू झाला. ते राजधानी कीव्हबाहेरील भाग इर्पिनमध्ये मारले गेले. प्रेस आयडीत ते न्यूयाॅर्क टाइम्सचे पत्रकार असल्याचे सांगण्यात आले. तथापि, न्यूयाॅर्क टाइम्सने सांगितले, सध्या रेनॉड आमच्यासाठी काम करत नाहीत. अनेक पुरस्कारप्राप्त रेनॉड गेल्या २ दशकांपासून पत्रकारिता करत होते. त्यांचा सहकारी रुग्णालयात दाखल आहे.
ब्रेंट रेनॉड दोन दशकांपासून युद्ध क्षेत्रांत पत्रकारिता करत होते.
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी घेतलेल्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत रशिया-युक्रेन युद्ध व भारतावरील त्याच्या परिणामावर चर्चा केली. यात संरक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान व आत्मनिर्भरता आणण्यावर भर दिला. त्यांनी युक्रेनमध्ये गोळीबारात मृत्यू झालेला भारतीय विद्यार्थी नवीन शेखरप्पाचा मृतदेह भारतात आणण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.युद्धामुळे युक्रेन येथील भारतीय दूतावास राजधानी कीव्हपासून तात्पुरता पोलंड येथे हलवण्यात आला आहे.