महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१४ मार्च । देवगड, रत्नागिरीच्या हापूस आंब्याची आवक शहरात वाढली आहे. त्यामुळे सुरुवातीला २२०० रुपये डझनचे दर आता ११०० ते १२०० रुपयांवर खाली आले आहेत. फेब्रुवारीपासून कोकणातील देवगड, रत्नागिरी हापूस विक्रीसाठी शहरात येत आहे. सुरुवातील पैठण गेट, शहागंज येथील व्यापाऱ्यांकडे एक-दोन पेटी येत होती. भाव २२०० रुपये डझन होते. आता १५ ते २० पेटीच्या वर आंबे विक्रीसाठी येत आहेत.
औरंगाबाद शहरातील मुख्य बाजारपेठ, सेव्हन हिल्ससह विविध ठिकाणी आंबा विक्रीची स्वतंत्र दुकाने सुरू झाली आहेत. एका पेटीत चार ते पाच डझन आंबे असतात. आवक वाढल्याने भावही प्रतिडझन १ हजार रुपयांनी कमी झाले आहेत. आंबा उत्पादक ते विक्रेत्यांमार्फत ग्राहकांना मागणीनुसार घरपोच हापूस दिला जातोय. यासाठी फेसबुक, व्हॉट्सअॅपवर पोस्ट टाकली जाते. तसेच आंबा खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना व्हिजिटिंग कार्ड देऊन फोनवरही ऑर्डर घेतली जाते, असे राजू आंबेवाला यांनी सांगितले.
लालबाग, बदामही स्वस्त, १५ क्विंटल आवक : विविध राज्यांतून मुंबई मार्गे जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत व शहरातील बाजारात लालबागचा राजा, बदाम, हापूस आंबा मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आला आहे. १२ मार्च रोजी १५ क्विंटल आंब्याची आवक झाली. कमीत कमी ९ हजार, सर्वसाधारण १७ हजार व सर्वाधिक २० हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. किरकोळ बाजारात लालबागचा राजा, बदाम २५० ते ३५० रुपये किलो दराने विक्री होत आहे. जसजशी आवक वाढत जाईल तसतसे दर कमी होतील.