महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१६ मार्च । दिशा सालियन प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नीतेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज दिंडोशी सत्र न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालय आज बुधवारी निर्णय सुनावणार आहे. न्यायालयाच्या त्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दिशा सालियनच्या मृत्यूनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नीतेश राणे यांच्याकडून सतत होणारी बदनामी होत होती. बदनामी रोखण्यासाठी दिशाच्या कुटुंबीयांनी महिला आयोगाला आणि मालवणी पोलिसांना विनंती केली होती. या प्रकरणात महिला आयोगाने लक्ष घालून दिशाच्या मृत्यूबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश मालवणी पोलिसांना दिले होते. आयोगाच्या आदेशानुसार मालवणी पोलिसांनी राणे पिता-पुत्रावर गुन्हा दाखल केला. या गुह्यात अटकपूर्व जामीन अर्जासाठी राणे यांचे वकील ऍड. सतीश माने शिंदे यानी दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेतली. राणे पिता-पुत्रांना 10 मार्चपर्यंत अटक करू नये असे आदेश न्यायालयाने दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर राणे पिता-पुत्र हे चौकशीसाठी मालवणी पोलीस ठाण्यात गेले होते. मालवणी पोलिसांनी राणे पिता-पुत्राची आठ तास चौकशी केली होती. राणे पिता-पुत्राच्या अटकपूर्व जामिनाबाबत आज दिंडोशी सत्र न्यायालयात अडीच तास सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अटकपूर्व जामीन अर्जावर बुधवारी न्यायालय निर्णय सुनावणार आहे.