Weather Forecast: उष्णतेच्या तीव्र लाटेनंतर राज्यात पावसाचं वातावरण ; पुण्यासह 12 जिल्ह्यात बरसणार सरी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२० मार्च । एकीकडे देशात तापमान वाढत असताना बंगालच्या उपसागरात ऐन मार्चमध्ये चक्रीवादळाची (Cyclone) स्थिती निर्माण झाली आहे. सध्या आग्नेय बंगालचा उपसागर आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र (Low pressure area) कार्यरत आहे. हे हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र बांगलादेश-उत्तर म्यानमारच्या दिशेनं पुढे सरकत आहे. येत्या काही तासांत याचं ‘असानी’ चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. पण याचा भारतीय किनारपट्टी धोका नसल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

चक्रीवादळाचा भारतीय किनारपट्टीला धोका नसला तरी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वाऱ्यांच्या स्थितीमुळे महाराष्ट्रातील तापमान किंचितसं घटलं आहे. तसेच आज कोकणासह घाट परिसर आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पावसासाठी पोषक हवामान तयार झालं आहे. मागील जवळपास दोन आठवडे सलग तापमानवाढीनंतर राज्यात पावसाचं हवामान निर्माण झालं आहे.

हवामान खात्याने आज पुण्यासह मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या बारा जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज सकाळपासूनच या जिल्ह्यात ढगाळ हवामानाची नोंद झाली आहे. तसेच कमाल तापमानात देखील किंचित घट झाली आहे. येत्या काही तासांत संबंधित जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसणार आहेत. उर्वरित राज्यात मात्र कोरडं हवामान राहणार असून उन्हापासून देखील काहीसा दिलासा मिळणार आहे.

उद्यापासून राज्यात कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे. मंगळवार आणि बुधवारी दोन्ही दिवशी दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, सध्या बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्याने पुढील दोन दिवस मच्छिमारांनी मासेमारी करण्यासाठी दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात जाऊ नये, असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *