विठ्ठल-रुक्मिणीचे पद्स्पर्श दर्शन सुरू करा; अन्यथा ……..

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२१ मार्च । कोरोनामुळे काही दिवस मंदिर बंद राहिले तर गेल्या दोन वर्षांपासून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पद्स्पर्श दर्शन बंद आहे. कोरोना संसर्ग कमी झाला तरी पद्स्पर्श दर्शन सुरू करण्यात आलेले नाही. यामुळे भाविकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. लवकरात लवकर गुढीपाडव्यापर्यंत पदस्पर्श दर्शन सुरू करा, अन्यथा मंदिर समीतीचे आदेश धुडकावून श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणावर डोके ठेवून दर्शन घेऊ, असा इशारा ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांनी दिला आहे.

श्री विंठ्ठल-रुक्मिणी मातेचे पद्स्पर्श दर्शन सुरू करण्याच्या मागणीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांनी रविवार, 20 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजता श्री विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालून नामदेव पायरी येथे भजन व आरती करत आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो भाविक सहभागी झाले होते.

मंदिर व्यवस्थापनाला या मागणीबाबतचे निवेदन दिले, यावेळ ते बोलत होते. वारकर्‍यांनी पुंडलिका वरदे हरी विठ्ठलाचा जयघोष केला. कोरोनाचा देशभर संसर्ग वाढू लागल्याने शासनाने निर्देश देण्यापूर्वी दक्षता म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती व्यवस्थापनाने 17 मार्च 2020 रोजी मंदिर पूर्णपणे बंद केले.

दोन वर्ष झाले तरी देवाचे पद्स्पर्श दर्शन सुरू करण्यासाठी मंदिर व्यवस्थापन पुढाकार घेताना दिसत नाही. यामुळे भाविकांतून नाराजीचा सूर निघत आहे. देवाच्या पायावर डोके ठेवण्यासाठी भाविक आतुर झालेला आहे. असे असताना मंदिर व्यवस्थापन लक्ष देत नाही, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यातील म्हणजे 17 मार्च 2020 ते 15 ऑक्टोबर 2020 या कालावधीदरम्यान मंदिर पूर्ण बंद होते.

16 ऑक्टोबर 2020 ते 20 नोव्हेंबर 2020 या दरम्यान मंदिर उघडून देवाचे मुखदर्शन सुरु करण्यात आले. पुन्हा 21 नोव्हेंबर 2020 ते 1 डिसेंबर 2020 या कालावधीत कार्तिकी वारी असल्याने मंदिर पूर्णतः बंद करण्यात आले. 2 डिसेंबर 2020 ते 21 फेब्रुवारी 2021 मंदिर सुरू राहिले. मात्र पुन्हा आषाढी वारीच्या निमित्ताने बंद करण्यात आले. एकूण दोन वर्षांची परिस्थिती पाहता मंदिर सतत बंद करणे आणि मुखदर्शन सुरू ठेवणे हा दिनक्रम मंदिर समितीने राबविला
आहे.

शासनाने निर्बंध घातल्याने मंदिर समितीने त्याची अंमलबजावणी केली. आता शासनाने सर्व त्या सवलती दिल्या आहेत. नुकतीच वारीदेखील भरली. सर्व गर्दीची ठिकाणे शासनाने मोकळी केली आहेत. मग वारकर्‍यांनाच देवापासून दूर का ठेवता? असा सवाल ह.भ.प. जोगदंड महाराज यांनी उपस्थित केला.

परिवार देवतांचे पद्स्पर्श दर्शन सुरू करा
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेसह सर्व परिवार देवतांचे पद्स्पर्श दर्शन त्वरित सुरू करा, बंद केलेल्या नित्यपूजा, पाद्यपूजा आणि चंदन उटी पूजा पुन्हा सुरू करा, असा निर्वाणीचा इशारा ह.भ.प. जोगदंड महाराजांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *