राज्यात 1 एप्रिल पासून कोरोना निर्बंध मुक्ती , मास्क वापरण्याचे नागरिकांना आवाहन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३० मार्च । गुढीपाडव्यापूर्वीच राज्यातील जनतेला अत्यंत चांगली बातमी मिळणार आहे. कोरोनाचा (Corona) संसर्ग रोखण्यात चांगले यश येत असल्यामुळे 1 एप्रिलपासून राज्यातील कोविड निर्बंध पूर्णपणे उठवले जाणार आहेत. कोरोनाच्या साथीच्या दरम्यान राज्यात लागू करण्यात आलेला आपत्ती व्यवस्थापन कायदा मागे घेण्यात येणार आहे. त्यामुळे जनतेवर लावण्यात आलेले निर्बंध (Restrictions) देखील हटणार आहेत. त्यामुळे मास्क वापरणे आता बंधनकारक राहणार नाही. मात्र, चीन व अन्य काही देशांतील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन मास्क (Mask) व सोशल डिस्टन्सिंगसाठी सतत आवाहन करण्यात येणार आहे.

राज्यातील कोविड व्यवस्थापनासाठी स्थापन केलेल्या राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये मंगळवारी याबाबत निर्णय घेण्यात आला असून लवकरच याबाबत अधिकृत परिपत्रक जारी करण्यात येण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांतील कोरोना रुग्णांची घटती रुग्णसंख्या विचारात घेता कोविड (Covid) संदर्भात लागू केलेले निर्बंध पूर्णत उठविण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या 1 एप्रिलपासून राज्य कोरोना निर्बंधमुक्त होणार असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. कोविड प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्यानंतर वेगाने लसीकरण करण्यात येऊन बहुसंख्य लोकांनी लस घेतल्याने कोरोनाचा धोका टळला आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांत कोरोना संक्रमणाचे प्रमाणही बऱयाच प्रमाणात खाली आहे.

कोरोनाच्या साथीच्या दरम्यान राज्यात लागू करण्यात आलेला आपत्ती व्यवस्थापन कायदा मागे घेण्यात येणार आहे. त्यामुळे मास्क वापरणे आता बंधनकारक राहणार नाही. मात्र, जनतेने मास्क वापरणे गरजेचे असल्याने तसे आवाहन शासनाच्या वतीने सतत करण्यात येणार आहे. तसेच याबाबत जनजागृतीही करण्यात येणार आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा मागे घेतल्याने कोविड निर्बंध न पाळल्याने होणारा दंडही पोलीस अथवा स्थानिक प्रशासन आकारू शकणार नाही. मात्र, राज्यात साथरोग नियंत्रण कायदा लागू राहील. रेल्वे प्रवासासाठी किंवा मॉल प्रवेशासाठी पूर्णतः लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र सक्तीचे आहे.

मात्र, आपत्ती व्यवस्थापन कायदा मागे घेतल्यानंतर हे बंधनही हटविण्यात येणार आहे. मात्र लसीकरण शंभर टक्के करण्याबाबत सरकारचा प्रयत्न राहणार आहे. सध्या राज्यात लसीकरणाचा वेग चांगला आहे, त्याचबरोबर प्रमाणही समाधानकारक आहे. मात्र, तरीही राज्यातील अंदाजे नव्वद लाख ते एक कोटी लोकांनी अद्यापही लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. त्यामुळे या लोकांनीही दुसरा घेण्याबाबत आवाहन आणि जनजागृती करण्यात येणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *